बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत!
प्रायोगिक तत्त्वावर निर्यात; शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २९ : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. औषधी गुण असणाऱ्या आणि रसरशीत जांभळाची चव आता लंडनमधील नागरिक घेणार आहेत. देशातील विविध भागातून परदेशात निर्यात झालेल्या जांभळांमध्ये बदलापूरच्या जांभळांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मागणी वाढल्यास बदलापुरातील शेतकरी समृद्ध होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात भाभा अनुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून जांभुळाचे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनातून बदलापुरात आढळणाऱ्या जांभूळ फळांमध्ये मधुमेह या आजाराशी लढणाऱ्या तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील जांभूळ व जांभळाच्या झाडाखालची माती ही लोह आणि विविध औषधी गुणधर्मांनीपूरक आहे. त्यामुळे बदलापुरातील जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाले. मागील दोन वर्षांत बदलापुरातील जांभूळ हे आंतरराज्य स्तरावर विक्रीस पाठवण्यात आले; मात्र यावर्षी बदलापुरातील जांभूळ या फळाने देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे.
देशभरातून विविध राज्यातून परदेशात निर्यात करण्यात येत असलेल्या जांभूळ या फळांमध्ये बदलापूरच्या जांभळाचे स्थान आता पक्के झाले आहे. यंदा पहिल्यांदाच बदलापुरातून १० किलो जांभूळ हे लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बदलापूर परिसरातील विविध ग्रामीण भाग, दुर्गम खेडेगाव या परिसरातील सेंद्रिय खतातून पोषण मिळालेल्या झाडांवरील आहेत. हे फळ मध्यम दर्जा असलेले टपोरे आणि रसरशीत असे आहे. तसे पाहिले तर जांभूळ या फळाला, शेल्फ लाइफ कमी असते. हे फळ झाडावरून तोडल्यानंतर चार ते पाच दिवसांत संपवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर यंदा निर्यात केली आहेत.
भविष्यात या जांभळांना मागणी वाढली, तर बदलापुरातील हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर त्यांचे आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू होईल, असा विश्वास जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास विश्वस्त आदित्य गोळे यांनी व्यक्त केला आहे.
जांभूळ संशोधन केंद्राची मागणी
बदलापुरात शेतकऱ्यांना रोजगार मिळण्यासाठी या जांभूळ फळावर सततचे संशोधन करून निर्यातीसाठी भर दिला पाहिजे, यासाठी बदलापुरात जांभूळ संशोधन केंद्र उभारण्याची मागणी आदित्य गोळे हे करत आहेत. जांभूळ या फळावर पडणारा कोड्या रोग, यावर काय खबरदारी घ्यावी किंवा फुलोरा आला तर कोणत्या औषधांची फवारणी करावी? यासाठी प्रत्येक वेळी दापोली कोकण कृषी विद्यापीठात जाणे शक्य नसल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार कक्ष ठाणे जिल्ह्यात व्हायला हवे. त्यामुळे केंद्र सरकारने जांभूळ संशोधन केंद्र जाहीर करावे. बदलापूर शहरात कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार केंद्र तरी सुरू करावे, अशी मागणी आदित्य गोळे करत आहेत.
विस्तार केंद्राबाबत आमदार सकारात्मक
कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार केंद्राबाबत आमदार किसन कथोरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्यांच्या सहयोगातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे आदित्य गोळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.