‘ऋतू बरवा’मध्ये डोंबिवलीकर मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ : ‘तुला मी मोगरा म्हणतो, मला म्हणतेस तू चाफा, बघू या दोन गंधांची कधी अदलाबदल होते’ अशा अनेक सुंदर कविता आणि तितकेच अप्रतिम बासरीवादन ऐकत डोंबिवलीकरांची संध्याकाळ अविस्मरणीय झाली. नुकतीच डोंबिवली येथील सर्वेश हॉलमध्ये ‘ऋतू बरवा’ची मैफल रंगली. दोन कलांचा बहर घेऊन आलेल्या ‘ऋतू बरवा’ य सुमधुर कार्यक्रमात येथील रसिकांना संगीतमय काव्यसरींनी मन भरून चिंब केलं.
मैफल दोन प्रतिभावान आणि लोकप्रिय कलाकारांच्या अद्वितीय कला सादरीकरणाने फुलली. मराठीतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता आणि प्रथितयश बासरीवादक अमर ओक यांच्या सुरेल बासरीवादनाने प्रेक्षक भारावून गेले होते. ‘सूर निरागस हो’, ‘नमो शिवाजी राजा’, ‘गजर आईचा’, ‘माउली माउली’ अशी अनेक लोकप्रिय गीते, भावगीते, हिंदी चित्रपटांतील काही गाणी अमर ओक यांच्या बासरीतून उमटली, तेव्हा दरवेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कलेला दाद दिली. अशी सुरेल मैफल पुन्हा एकवार अनुभवली पाहिजे, असे उपस्थित रसिकांनी आवर्जून सांगितलं.
‘हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे.. मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे’ ही आणि ‘झांजर’, ‘भाजी’, ‘एक पेग’, ‘आनंदघन’ अशा काही खुमासदार कविता वैभव जोशी यांनी सादर केल्या. की बोर्डवर निनाद सोलापूरकर, ड्रम्सवर अभिजित भदे आणि तबल्यावर विक्रम भट या वादकांनी उत्कृष्ट साथ देत कार्यक्रमाला आणखीच रंगत आणली. काव्य-संगीताने बहरलेल्या या वातावरणात अनेकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले. या कार्यक्रमाचे निर्माते बरवा स्किन थेरपीचे जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे हे आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामाक्षी बर्वे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.