अंधश्रद्धेच्या नादात बंजारा महिलेची हत्या
कळवा, किरण घरत
- कळव्यामध्ये अंधश्रद्घेच्या नादात एका बिगारी महिलेची निर्दयी हत्या केल्याची घटना समाेर आली आहे. विशेष म्हणजे मारेकरी हे बिहारचे असून नवीन उद्योग किंवा गुन्हेगारी विश्वात यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. या हत्येचा तपास कळवा पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
१४ जून रोजी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी कळवा पोलिसांना कावेरीसेतू रस्त्यावरील सीमा हाईट या निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक ४० वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर आणि गुन्हे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक नावडे हे पोलिस सहकाऱ्यांसह घटनास्थळी तत्काळ पोहोचले. तिने परिधान केलेल्या कपड्यावरून ती बंजारा समाजातील असून, बिगारी कामगार असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. तिच्या मानेवर गंभीर जखम झाली होती. तसेच हिरव्या रंगाच्या ओढणीने तिचा गळा आवळण्याची खून दिसून येत होती. तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनावरून महिलेची धारधार शस्त्राने अंगावर २४ वार करून तसेच गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. दरम्यान, गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून ही महिला कळवा पूर्व येथील सम्राट अशोक नगर झोपडपट्टीत राहणारी शांताबाई चव्हाण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कळवा नाक्यावर ती दररोज बिगारीच्या कामासाठी जात होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कळवा पोलिस, गुन्हे शाखा घटक १ व मध्यवर्ती गुन्हे शाखा कक्ष अशी तीन पथके तयार करून हत्येचा शोध सुरू केला. या वेळी कळवा नाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनेच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास तीन तरुण या महिलेबरोबर चालताना दिसले. तर घटनास्थळी दोन चाकू, काही दागिन्यांचे तुटलेले तुकडे आणि रक्ताने माखलेली कपड्याची चुंबळ मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत कळवा पूर्वमध्ये पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. त्यावेळी संबंधित तरुण शांतीनगर झोपडपट्टीत गेल्या दोन महिन्यांपासून भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच कळवा पूर्व येथील एका फरसाणच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित तरुण पावणेचार वाजता कपडे बदलून पळून जाताना दिसले. पोलिसांनी कळवा रेल्वेस्थानकावरील फुटेज तपासले तेव्हा कुर्ला टर्मिनसमध्ये ते दिसून आले. त्यांनी दोन मोबाईलवरून तीन तिकिटे काढल्याने त्यांना ट्रेस करताना १५ जूनचा दिवस उजाडला. या मोबाईलचे लोकेशन बिहारमध्ये सापडले. दुसऱ्या दिवशी त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंपळे यांचे पथक आणि गुन्हे शाखा १चे पथक बिहार येथील खगरिया या गावी पोहोचले. दरम्यान, महिलेचे दागिने विकून आलेल्या पैशातून संबंधित तरुण मौजमजा करताना दिसून आले. या वेळी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. या हत्येतील मुख्य आरोपी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग (वय ३०), देवराज मदन कुमार (वय १९) तसेच एक १७ वर्षीय अल्पवयीन होता. यातील विश्वजित हा मुख्य आरोपी होता. त्यानेच कळव्यामध्ये या हत्येप्रकरणी सावज हेरून जागा निश्चित केली होती. गावामध्ये गरिबी असल्याने एखादा नवीन उद्योग किंवा पहिली चोरी करायची असेल तर दागिने घातलेल्या महिलेची हत्या करायची, असा समज परिसरातील नागरिकांचा आहे. त्यामुळे केवळ अंधश्रद्धेच्या नादात या महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.