नवीन पनवेल, ता. ३० (बातमीदार) : ताजी, सेंद्रिय आणि पोषक भाजी मुलांना आहारात खाण्यास मिळाली, तर त्यांचे पोषण परिपूर्ण होते. याच भाज्या शाळेच्या परसबागेत लावून त्यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात करण्याचा उपक्रम खानाचा बंगला येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविला जात आहे. पनवेल तालुक्यात यशस्वी झालेला हा पहिलाच प्रयोग असून, सलग दोन वर्षांपासून या शाळेला तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक मिळत आहे.
वावंजे केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर खानाचा बंगला ही शाळा आहे. आजूबाजूला नैसर्गिक वातावरण आणि उत्साही विद्यार्थी. मग शाळेजवळच दीड ते दोन गुंठे जागेत मशागत करून त्यांनी पेरणी केली. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थीही आनंदाने त्या बागेची मशागत करू लागले. दुधी भोपळा, कारली, वांगी, मिरची, केळी, भेंडी, कोथिंबीर, काकडी, मेथी, चवळी, टोमॅटो, पालक, मुळा, ऊस, पेरू, चिकू, सिताफळ, गवती चहा या भाज्या पिकू लागल्या. शाळेच्या पोषण आहात त्या भाज्यांचा समावेश झाल्याने विद्यार्थीही आनंदाने खाऊ लागले. आता या शाळेतील विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या मदतीने मशागतीचे नियोजन केले आहे. सर्वांगीण पोषण आहारासाठी पालकांमध्येही या उपक्रमाने जनजागृती होत असून, थोडेफार सरकारचे आर्थिक सहकार्य, लोकसहभाग, पालक आणि शिक्षकांच्या पैशांतून या परसबागेची मशागत होत आहे. निसर्गाच्या सहवासात विद्यार्थ्यांना शेती, पिके याबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------
सलग दुसऱ्यांदा पारितोषिक
खानाचा बंगला शाळेची परसबाग पाहण्यासाठी इतर शाळांतील विद्यार्थी, मान्यवरही खास भेट देत आहेत. योग्य नियोजन आणि यशस्वी होणारा हा पनवेल तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक मिळाले आहे. वावंजे केंद्रप्रमुख भालचंद्र पाटील, मुख्याध्यापक प्रसाद म्हात्रे, शिक्षिका अर्चना देठे, रेखा पाटील यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मिळून परसबाग फुलवत आहेत.
---------------
परसबागेतील फुलांपासून बुके
भाज्यांबरोबरच या परसबागेत सोनचाफा, गुलाब, शेवंती, अंबाडी, जास्वंद, गोकर्ण यासारखी फुलझाडे बहरली आहेत. काही कार्यक्रम किंवा मान्यवर आले तर त्यांच्या स्वागतासाठी बाहेरून पुष्पगुच्छ आणण्याऐवजी परसबागेतील फुलांपासूनच विद्यार्थी बुके बनवतात आणि स्वागत करतात.
-------------------
परसबागेत पिकवलेल्या भाज्या, फळांचा आहार विद्यार्थ्यांना मिळावा असा सरकारचा उपक्रम होता. त्यात आम्ही सहभाग घेत दीड ते दोन गुंठे जागेत परसबाग फुलवली. आता आमचे विद्यार्थीच आनंदाने मशागत करतात. सेंद्रिय शेती, पिके, फळे, भाजीपाला याचे परिपूर्ण ज्ञान त्यांना मिळत असल्याने दुहेरी फायदा होत आहे.
- प्रसाद म्हात्रे, मुख्याध्यापक, खानाचा बंगला शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.