नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : केवळ एक हजार रुपयांसाठी आपल्या सहकारी ट्रकचालकाची हत्या करून १४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी क्लीनरला गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. लक्ष्मण गंगाधर काकडे (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पुढील तपासासाठी एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मृत आजीनाथ त्र्यंबक दौड हा ट्रकचालक व त्याची हत्या करणारा आरोपी क्लीनर लक्ष्मण काकडे हे दोघे एकत्र काम करत होते. २६ नोव्हेंबर २०११ला हे दोघेही ट्रक घेऊन एपीएमसीमध्ये आले असताना त्यांच्यामध्ये फक्त एक हजार रुपयांवरून भांडण झाले होते. या भांडणामध्ये लक्ष्मण काकडे याने आजीनाथ दौड याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करून पलायन केले होते. त्या वेळी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. दरम्यानच्या काळात पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील जुन्या खुनाच्या गुन्ह्यांची फेरतपासणी करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने या फरार आरोपीचा शोध सुरू केला होता. तपासात या गुन्ह्यातील फरार आरोपी हा पुणे जिल्ह्यातील खेड येथे असल्याची माहिती मिळाली.
--------------------------
खेडमधून आरोपी ताब्यात
गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कोकरे, सतीश भोसले, पोलिस हवालदार अनिल यादव, पोलिस नाईक ठाकूर आणि पोलिस शिपाई नवनाथ पाटील आदींच्या पथकाने पुण्यातील खेड येथे जाऊन आरोपी लक्ष्मण काकडे याला ताब्यात घेतले. या आरोपीला पुढील तपासासाठी एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.