चिखलमय रस्त्याने घेतला तरुणाचा बळी
कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
मुरबाड, ता. २ (बातमीदार) : कल्याण-मुरबाड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे, यासाठी ठिकठिकाणी महामार्ग खोदण्यात आला आहे; मात्र पावसामुळे या रस्त्यावर चिखल आणि राडारोडा पसरला आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालवणे मुश्कील झाले आहे. बुधवारी (ता. २) या रस्त्यावर हिंदूसेवा संघाजवळ चिखल मिश्रित रस्त्यावर एक दुचाकी घसरली. यात पाठीमागून येणाऱ्या डम्परचे चाक या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहन राजेंद्र मलाहा (वय २०) (रा. जमील नगर, भांडुप) असे मृत तरुणांचे नाव आहे.
कल्याण-मुरबाड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत शनिवारी (ता. २९) सकाळमध्ये ‘चिखलामुळे अपघातांचा धोका’ या मथळ्यासह बातमी प्रसिद्ध झाली होती; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांनी रस्त्यावरून चिखल हटवण्याचे काम केले नाही, त्यामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला आहे. कल्याण-मुरबाड माळशेज घाट महामार्गाच्या पाचवा टप्पा ते मुरबाड रस्त्याच्या चौपदरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. सध्या पावसाने या रस्त्यावर चिखल साचला आहे. या चिखलातून वाहन चालवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
दोन वर्षांपासून प्रवासी मुरबाड-कल्याण रस्त्याच्या कामाचा त्रास सहन करीत आहेत. अनेक ठिकाणी गुडघाभर चिखल तयार झाला आहे. याला ठेकेदाराची निष्काळजी जबाबदार आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांअभावी निष्पाप दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून मृताच्या नातेवाइकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.
- रवींद्र चंदने, अध्यक्ष ठाणे जिल्हा, आरपीआय सेक्युलर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.