खारघर, ता. ३ (बातमीदार) : खारघरमधील कोयना प्रकल्पग्रस्त ओवे कॅम्प गावात भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. ऐन पावसाळ्यात पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईमुळे महिलांना कपडे, भांडी धुण्यासाठी गावाशेजारील ओढ्याकडे धाव घ्यावी लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून, गटारे दगड, मातीने भरून वाहत आहेत. पालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावातील समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोयना प्रकल्प उभारताना राज्य सरकारने १९६२ मध्ये परिसरातील काही गावांचे विविध ठिकाणी स्थलांतर करताना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार खारघरमधील टाटा हॉस्पिटलच्या मागील बाजूस ओवे कॅम्प गावची निर्मिती करण्यात आली. गाव स्थलांतर होऊन ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. गावात जवळपास २०० कुटुंबे असून, लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात आहे. येथील ग्रामस्थ रस्ते, पाणी, वीज, गटारे अशा अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. सिडकोने खारघर शहराची निर्मिती केली; मात्र गावांकडे सिडकोने ढुंकूनही पाहिले नाही. पालिकेच्या स्थापनेपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात रस्ते, गटारे आदी कामे केली जात असत. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर सात वर्षांत प्रथमच गावात जलवाहिनी काम हाती घेतले आहे; मात्र ते अजूनही पूर्ण झाले नाही. ग्रामपंचायत काळात गावात उभारलेले ५४ हजार लिटरचा जलकुंभ कोरडा पडला आहे. गावात चार ते पाच दिवसांतून एक वेळ पाणी येत असल्यामुळे पालिकेकडून गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर गल्ली बोळात जात नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये साठा करून गरजेनुसार उपयोग करावा लागत आहे.
-------------------
कपडे धुण्यासाठी ओढ्याचा आधार
नुकत्याच मुसळधार पावसामुळे गावाशेजारील नाल्यात, ओढ्यात पाणी वाहत असल्यामुळे महिलांना कपडे व भांडी धुण्यासाठी ओढ्याचा आधार मिळाला आहे. गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गटारी तुडुंब भरली आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. पालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावातील समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विलास चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
---------------
गावात नळाद्वारे चार ते पाच दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिका आयुक्तांनी गावाला भेट देऊन समस्या दूर करावी.
- सुभाष साळुंखे, ग्रामस्थ, ओवे कॅम्प
---------------
नवीन जलकुंभासाठी पाठपुरावा
ओवे कॅम्प गावात अमृतजल योजनेअंतर्गत पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारण्यासाठी सिडकोकडून जागेची मागणी केली आहे. जागेची मंजुरी मिळताच जलकुंभ उभारणीचे काम हाती घेणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.