पालिकेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निविदेत घोटाळा
काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार असून, ही संपूर्ण यंत्रणा दलालांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त या अभियाना अंतर्गत मुंबई काँग्रेसने मुंबई महापालिका आणि सरकारच्या कामकाजातील अनियमितता समोर आणली आहे. भांडुप कॉम्प्लेक्स (२००० एमएलडी) व पांजापूर (९१० एमएलडी), जलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी काँग्रेसने उघड केल्या. मंत्रालयात दलालांचा मुक्त वावर असून, कामांचे वाटप आणि ठराव त्यांच्या मर्जीने होतो. अधिकाऱ्यांच्या संगनमताने निविदांमध्ये छेडछाड करून नियम मोडले जातात, असा आरोप सावंत यांनी या वेळी केला.
भांडुप येथील प्रकल्पासाठी ४३७६ कोटींची निविदा १० ऑक्टोबर २०२३ रोजी काढण्यात आली, मात्र सदर निविदा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली, सातव्या जोडपत्रकात मूळ पात्रता निकषात बदल करून भारतातीलच अनुभव आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आल्यामुळे जागतिक कंपन्यांचे दार बंद करून एका ठरावीक कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. निविदेतील या बदलामुळे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सरळसरळ उल्लंघन झाले असून, सदर निविदा अंतिमतः मूळ किमतीपेक्षा जवळपास ३० टक्क्याने वाढीव दराने मंजूर करण्यात आली, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. या वेळी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, नगरसेवक मोहसिन हैदर, प्रवक्ते निजामुद्दीन राईन उपस्थित होते.
...............
पांजरापूर प्रकल्पात निविदा रद्द
पांजरापूरच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २४ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा काढण्यात आली, मात्र त्यानंतर आठ वेळा निविदा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सदर प्रकरणाला काेणताही प्रतिसाद न मिळाल्याने निविदाच रद्द करण्यात आली. यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे ठरावीक कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्याचा संशय असून, ११ जुलै रोजी आणखी एक जोडपत्रक जाहीर करून ३१ जुलै ही नवीन अंतिम तारीख दिली गेली आहे, परंतु त्या आगाेदर झालेल्या बोलीपूर्व बैठकीची इतिवृत्ते अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.