पक्ष्यांच्या किलबिलाटाने पर्यटक मंत्रमुग्ध
गणेशपुरी उसगाव येथे निसर्ग बहरला
दीपक हिरे ः सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. ३१ : भिवंडी तालुक्यातील मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उसगाव येथील धरण परिसरातील धबधबा, डोंगर रांगांनी जणू हिरव शालू परिधान केला आहे. पावसामुळे निसर्ग बहरला असून, पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उसगाव डॅम येथील धबधबा म्हणजे पर्यटनाचे माहेरघर समजले जाते. काश्मीरसारखेच आल्हाददायक वातावरण गणेशपुरीत पर्यटकांना अनुभवास मिळत असल्याने निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उसगावला पर्यटक प्रथम पसंती देतात.
शनिवारी व रविवारी येथे पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसून येते. त्यातच पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या सरीमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंदही पर्यटकांना अनुभवयास मिळत आहे. सध्या श्रावण सरीमध्ये सूर्यनारायणाचे दर्शन तर कुठे इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी छटा अनुभवायला मिळत आहेत. तसेच कोकीळ, ढोक, मोर, बुलबुल या पक्ष्याचे विविध मंत्रमुग्ध करणारे मधुर आवाज कानी पडत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार हवेची झुळूक, पावसात ओलेचिंब व्हायचे आणि गरमागरम कांदा भजी व वाफाळलेल्या चहावर ताव मारायचा हा पर्यटकांचा नित्यनियम असल्याने स्थानिक स्टाॅलधारक, ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होत आहे. उकडलेल्या व भाजलेल्या मक्याच्या कणसांवरही पर्यटकांनी थंडी उडवण्याचा केलेला प्रयत्न पाहण्यासारखा आहे.
स्वामी नित्यानंद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या परिसरातील उसगाव येथील धरतीचा स्वर्ग म्हणून प्रख्यात असलेला उसगाव धबधबा, तसेच बोकड कडा, धबधबा, तानसा नदीमधील गरम पाण्याचे कुंडे, धार्मिक पर्यटनाला जोड देणारे स्वामी नित्यानंद महाराजांचे समाधी मंदिर, वज्रेश्वरी येथील किल्लेवजा वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर, अकलोली येथे रामेश्वर मंदिर पर्यटकांना खुणावत आहे.
पोलिस बंदोबस्त
उसगाव धरणानंतर पर्यटकांची पावले आपसूक सांडव्याकडे वळतात. धरणाच्या काठावर पाण्यात हौशी पर्यटकांच्या पाण्यात उड्याही पाहण्यास मिळतात, पंरतु काही हौशी पर्यटक आपली चारचाकी वज्रेश्वरी रस्त्यावरच पार्किंग करतात. त्यामुळे अनेकांना कोंडीचा सामना करावा लागतो. या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी गणेशपुरी पोलिस कर्मचारीही या जागेवर तैनात केले आहेत.
पर्यटनबंदीमुळे हिरमोड
निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ का होईना मन ताजे व प्रसन्न होते. धबधबे पर्यटनबंदीमुळे पर्यटक तलाव परिसरात जात नाहीत, मात्र या परिसराचे वन विभागाने चांगले सुनियोजन केले, तर हा भाग जंगल पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया गणेशपुरी येथील ग्रामस्थ सुनील देवरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.