
OBC leaders addressing a press conference demanding cancellation of the September 2 GR and release of a white paper, with Vijay Wadettiwar highlighting the six-day ultimatum to the government.
esakal
OBC Leaders Demand Cancellation of September 2 GR : ओबसी नेते आणि राज्य सरकार यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. २ सप्टेंबरचा जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीवर ओबीसी नेते ठाम आहेत, शिवाय याच पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर रोजी ओबीसी समाजाकडून भव्य मोर्चाचेही आयोजन केले गेले आहे. तर हा मोर्चा काढू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत ओबीसी नेत्यांना केली आहे, परंतु ओबीसी नेत्यांनी सरकारकडे १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे, २ सप्टेंबरचा जीआर रद्द करावा आणि श्वेतपत्रिका काढावी, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाला माहिती दिली, ते म्हणाले ‘’आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी नेते छगन भुजबळ, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी नेते यांची बैठक पार पडली. यामध्ये २ सप्टेंबरच्या जीआर संदर्भात, जो मराठा समाजाचं मोठ्याप्रमाणात ओबीसीकरण, कुणबीकरण करण्याचा जीआर काढलाय. या जीआरवर आणि ओबीसींच्या अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवर चर्चा झाली.’’
तसेच ‘’यावेळी छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी भूमिका मांडली. यावर सरकारकडून सकारात्मक चर्चा होईल आणि ओबीसी समाज या जीआरमुळे फार मोठ्या अडचणीत आलेला आहे. त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक समाज एकमेकांविरोधात उभा राहताना दिसत आहेत. समाजात प्रचंड मोठी दरी निर्माण करण्याचं काम या जीआरमुळे होत आहे, हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.’’ असं वडेट्टीवारांनी सांगितलं.
याशिवाय ‘’हा जीआर काढत असताना कुठेही २००२चा जीआर आणि त्यानंतर २०१२ म्हणजे त्यामध्ये जे नियम तयार झाले. ते नियम कुठेही या जीआरमध्ये पाळले जात नसल्याचे दिसत आहे. त्या जीआरमध्ये या नियमांचा कुठेही उल्लेखही केलेला दिसत नाही. अनेक पळवाटा असून, कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना प्रमाणपत्र मिळेल, अशाप्रकारची व्यवस्था त्या जीआरमध्ये दिसत आहे. स्थानिक चौकशी अहवालात ज्या गोष्टींचा समावेश केला गेला आहे. त्यातून सरळसरळ पूर्ण वंशावळीला कसा लाभ होईल, अशाप्रकारचा विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला.’’ अशी माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
याचबरोबर ‘’आम्ही सांगितलंय, की २ सप्टेंबरचा जीआर रद्द करा. मीही मागणी केली आणि पंकजा मुंडेंनी सुद्धा मागणी केली आहे. २०१४पासून मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले आहेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्याची श्वेतपत्रिका काढा, ही देखील मागणी केली आहे. इतरही भरपूर मागण्या होत्या, परंतु त्या आमचा त्या मागण्यांवर जोर नव्हता. कारण, आमच्या हक्काचं संरक्षण आधी करणं हे आमचं काम होतं.’’ असंही वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान ‘’ यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या जीआरसंदर्भात सविस्तर माहिती देत असताना, आमचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली, की तुमचा १० ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा रद्द करावा, अशी विनंती केली. मात्र मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, की तुम्ही म्हणालात आमचा डीएनए हा ओबीसी आहे. तर माझी विनंती आहे की, तो २ सप्टेंबरचा जीआर रद्द करा आणि १० ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी मोर्चात पाठवा. श्वेतपत्रिका काढून आणि तो २ सप्टेंबरचा जीआर रद्द करून, प्रतिनिधी मोर्चा पाठवा. आम्ही त्या प्रतिनिधीचं आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मोर्चात स्वागत करू.’’ अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘’पण आम्ही सर्व सकल ओबीसी महामोर्चाने ठरवलं आहे की, १० ऑक्टोबरचा मोर्चा करायचा. या मोर्चात ओबीसी बांधवांच्या मनात जो संताप आहे, तो व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाज येणार आहे. जर मुख्यमंत्री आणि सरकारला काही वाटत असेल, तर त्यांनी तो सकारात्मक निर्णय़ घ्यावा. १० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे, तो मोर्चा आम्ही काढणार आहोत. ‘’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.