सूचना - शिक्षण विभागाचा कोट बाकी आहे.
हक्काच्या शिक्षणापासून वंचित!
पनवेल परिसरात फक्त ७४ शाळाबाह्य विद्यार्थी
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे धोरण आहे. पनवेल तालुक्यात ७४ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध लागला असला तरी अनेक मुले शिक्षणांपासून वंचित आहेत.
आरटीई तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण देण्याच्या अनुषंगाने केंद्र, राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेशसुद्धा दिला जात आहे. मात्र कागदी घोडे नाचवणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे आजही कित्येक लहान मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. कळंबोली सर्कल परिसरात अनेक कुटुंबे एक वेळच्या अन्नाच्या शोधात दिवसरात्र भटकंती करतात. या ठिकाणी डोंबाऱ्याचा खेळ करणारी अनेक कुटुंबे विखुरली आहेत. ही मुले कचरा वेचून आई-वडिलांना आर्थिक हातभार लावत आहेत. तर काही जण सिग्नलवर गजरे आणि इतर वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
-------------------------------------------
मुख्य कारणे
कागदपत्रांचा अभाव ः रस्त्यावर, बस स्टॉप, रेल्वेस्थानकांच्या पुलाखाली वास्तव्य करणारी मुले शाळेमध्ये येऊ शकतील, परंतु त्यांच्याकडे जन्मदाखला, कुटुंबीयांच्या माहितीची कागदपत्रे, आधार कार्ड नसते.
स्थलांतराची वेळ ः पनवेल परिसरात शाळेत न जाणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषिक मुलांची संख्या कमी आहे; मात्र उदरनिर्वासाठी इतर राज्यांतून आलेली मुले शाळेत जात नाहीत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल ः शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. अन्न, वस्त्र, निवारा, या गरजा भागवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. राहण्यासाठी ठिकाण नसल्याने मुलांना शाळेत पाठवले जात नाही.
पालक निरक्षर ः अनेक पिढ्या निरक्षर असल्याने शिक्षणाचे महत्त्व समजत नाही. सामाजिक पातळीवर संबंधितांना सामावून घेण्यामध्ये अडचणी येतात. या सर्व गोष्टी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास कारणीभूत आहेत.
---------------------------------------
पालिकेच्या एका शाळेत ७० टक्क्यांहून अधिक मुले नेपाळची रहिवासी आहेत. त्यांचा बुद्ध्यांक, शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. हाच वस्तुपाठ ठेवत शिक्षण विभागाने अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत आणि सहकार्य घेणे गरजेचे आहे.
- वैशाली जगदाळे, अध्यक्ष, संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.