समृद्धीवरील वेगावर तिसऱ्या डोळ्याची नजर
शहापूरमधील महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे टिपणार हालचाली
भरत उबाळे ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ४ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते वडपे यादरम्यानच्या अंतरातील वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. अमर्यादित वेगापायी महामार्गावर मोठ्या संख्येने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावरील हालचाली टिपण्याचे काम करणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम येथे वेगाने सुरू करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या नजरेमुळे महामार्गावर अमर्याद वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणले जाणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास ऑनलाइन दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे शहापूर, कल्याण आणि भिवंडी तालुक्यांतून कनेक्टिव्हिटी वाढली आहे. महामार्गावर कारसाठी ताशी किमान १२० किमी. तसेच ट्रकसाठी ताशी किमान ८० किमी. अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे, परंतु वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वेळ व अंतर घटल्यामुळे प्रवासी समृद्धी महामार्गाला विशेष पसंती देत आहेत, परंतु वेगावर नियंत्रण आणून अपघाताची संख्या रोखण्याचा प्रयत्न करणे आवश्यक बनल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याची मदत घ्यावी लागली आहे. वेगमर्यादा कॅमेऱ्यात टिपली जाणार असल्याने तसेच दंडाची कारवाईदेखील केली जाणार असल्याने साहजिकच वाहनचालकांवर वेगाची मर्यादा राखण्याची जबाबदारी येणार आहे. परिणामी अपघाताची संख्या घटण्याची शक्यता आहे.
प्रत्येक एक किलोमीटरवर कॅमेरा
समृद्धी महामार्गावर लहान तसेच जड वाहनांची वेगमर्यादा किती असावी, यावर आता सीसीटीव्ही नजर ठेवणार आहे. प्रत्येक एक किमी अंतरावर एक कॅमेरा याप्रमाणे कसारा ते वडपे या अंतरात कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
उल्लंघन केल्यास ऑनलाइन दंड
महामार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बारीकसारीक बाबींवर लक्ष ठेवणार आहेत. एक कॅमेरा ५०० मीटर परिघातील चित्रण करेल इतकी त्यांची क्षमता असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीच्या व्यवस्थेसाठी ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करून त्यातून चित्रीकरण तपासले जाणार आहे. महामार्गाने प्रवास करताना नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहनचालकांना ऑनलाइन दंड ठोठावला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.