कासा, ता. ६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये झाडांवर व मोक्याच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या फलकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमानिमित्त मोठमोठे बॅनर झाडांवर लावले जात असून, कार्यक्रम संपल्यानंतरदेखील हे बॅनर अनेक महिने तसेच टांगलेले राहतात. परिणामी परिसराचे विद्रूपीकरण होत असून, झाडांनाही मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचत आहे.
लग्नसमारंभ, मुंज, वाढदिवस, राजकीय पक्षप्रवेश, विविध सभा, दवाखाने व हॉटेल्सच्या उद्घाटनप्रसंगी हे बॅनर झाडांवर, विजेच्या खांबांवर किंवा रस्त्याकडेला मोक्याच्या ठिकाणी लावले जातात. लवकर येणारा गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी तसेच राजकीय नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त लावले जाणारे फलकही आहेत. काही ठिकाणी हे बॅनर वर्षानुवर्षे तसेच राहतात. त्यामुळे संपूर्ण परिसर विद्रूप दिसतो.
झाडांवर बॅनर लावताना थेट खिळे ठोकले जातात. त्यामुळे झाडांना कायमस्वरूपी इजा होते. वर्षानुवर्षे सावली देणारी झाडे या कारणामुळे हळूहळू सुकून जातात. बॅनर वाऱ्यामुळे उडत रस्त्यावर येतात आणि वाहतूक अपघातांचेही कारण बनतात. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
कासा येथील मुख्य बाजारपेठ, एसटी स्टँड, मुख्य चौक अशा मोक्याच्या ठिकाणी झाडांवर बॅनर लावले गेले आहेत. यामुळे परिसराचे सौंदर्य नष्ट झाले असून, झाडांचे नुकसानदेखील होत आहे. काही बॅनर इतके जुने झाले आहेत, की ते पावसात ओले होऊन झाडांवरच लटकून राहतात.
प्रशासनाची कारवाई आवश्यक
वाढत्या जाहिरातबाजीमुळे परिसराचे सौंदर्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने ठोस कारवाई करणे, परवानगीशिवाय बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
कार्यक्रमाचे बॅनर कार्यक्रमानंतर दोन दिवसांत काढले पाहिजे. झाडांवर खिळे मारून बॅनर लावणे हा पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाने अशा बॅनरवर कारवाई करून ते त्वरित हटवले पाहिजेत.
- जयेश धर्ममेहेर, पर्यावरणप्रेमी
कासा परिसरात झाडांवर व मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत बॅनर लावल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बॅनर हटवण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. तसेच यापुढे बॅनर लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असून, यासाठी नियमावली तयार केली जात आहे.
- सुनीता कामडी, सरपंच, कासा ग्रुप ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.