भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ५ : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याने दातृत्व भावना बाळगून मुंबई आणि उपनगरांची गेली अनेक वर्षे तहान भागवली आहे. परंतु, हाच दातृत्वभाव बाळगणाऱ्या शहापूर तालुक्याला पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट सोसावे लागत आहे. आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी भावली धरणावरील योजनेतून पाणीपुरवठा करण्यास विरोध केला आहे. आमदार हिरामण खोसकर यांच्यापाठोपाठ भावलीच्या वादात गोडसे यांनी थेट उडी घेतली आहे. यानिमित्ताने त्यांनी सोमवारी (ता. ४) इगतपुरी येथे भेट दिली.
इगतपुरी तालुक्याची जलवाहिनी असणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील भूसंपादनात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्याच्या शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासींनाच मिळावे. पाणी शहापूरला जावू देणार नाही, असा थेट इशाराच खासदार गोडसे यांनी दिला. दीड टीएमसी क्षमतेच्या भावली धरणातून शहापूर तालुक्याला पाणी देण्याबाबत सरकारचे धोरण आहे. या धोरणाला गोडसे यांनी विरोध केला आहे. नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत पाणी देण्यास हरकत घेतली होती. भावली धरणातून इगतपुरी नगरपालिका, घोटी ग्रामपालिकेसह अन्य १० ते १२ गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. शिवाय, याच धरणातून मराठवाडा, अहिल्यानगरला आरक्षित पाणी सोडले जाते. एप्रिल व मे महिन्यातच धरण कोरडे पडते. या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी शहापूरसाठी अन्य धरणातून पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भावलीतील पाणी देण्यास हरकत घेतली आहे.
शहापूरला अन्य धरणातून पाणी दिल्यास भावली धरण परिसरात असलेल्या भागातील जलस्रोतांचे संतुलन राखले जाऊन स्थानिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्नही निकाली निघेलण, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे. दरम्यान, माजी खासदार हेमंत गोडसे व आमदार हिरामण खोसकर यांनी शहापूरला पाणी देण्यास विरोध केल्याने शहापूर तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
मुळातच अवघे दीड टीएमसी क्षमता असलेल्या या धरणावर अनेक गावे आणि आरक्षित पाण्याचा भार आहे. त्यातच सरकारचे या धरणातून शहापूर तालुक्याला पाणी देण्याचे धोरण आहे. शहापूरला पाणी दिले, तर इगतपुरी, घोटी यांसह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- हेमंत गोडसे, माजी खासदार, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.