स्वप्नांची राखरांगोळी
नवी मुंबई बाजार समिती आगीच्या विळख्यात
जुईनगर, ता. ६ ः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे; पण लाखोंच्या उलाढालीचे केंद्रात आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे पिकवलेला शेतमाल बाजारात विकून कष्टाचे मोल मिळवण्याच्या बळीराजाच्या स्वप्नांची राखरांगोळी सुरू आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजार समिती आहे. मुंबई आणि उपनगरांतील अन्नधान्य, फळे, भाजीपाला, धान्य, डाळी, तेलबिया आणि इतर कृषी उत्पन्नाची विक्री व्यवस्था नियंत्रित करते. यामध्ये व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि शासन यांच्यातील व्यवहार पारदर्शकपणे पार पडावेत, यासाठी ही समिती कार्य करते; पण व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ही व्यापाऱ्याचे प्रमुख केंद्र असलेली बाजार समिती आगीच्या घटनांचा हॉटस्पॉट ठरला आहे.
-------------------------------
प्रतिवर्षी आगीची एक घटना
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी एखादी तरी आगीची घटना बाजार समितीच्या मार्केटमध्ये घडत असते. २०१० सालापासून बाजार समितीला अग्निशमन यंत्रणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिका देत आहे; मात्र अद्याप बाजार समितीने याबाबत ठोस पावले उचलली नसल्याने भविष्यात खेळ सुरूच राहणार आहे.
-----------------------------
अग्निशमन केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष
बाजार समितीमधील फळ मार्केट परिसरात एक्झलरी इमारतीत १,७७५ चौरस फुटाची जागा आगप्रतिबंधक विभागासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी अग्निशमन कार्यालय आणि फायर इंजिन पार्क करण्यासाठी जागा वापरणार होती; मात्र नवी मुंबईत बाजार समिती आल्यापासून जागेचा वापर करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
--------------------------------
व्यवस्थापन समिती उदासीन
बँक आणि निर्यातदार या दोघांच्या मध्ये असलेल्या अग्निशमन केंद्राच्या राखीव जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या जागेला कुलपाची किल्लीदेखील तिसऱ्याच माणसाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजार समितीसाठी अत्यावश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेची गरज कोणाच्याही लक्षात येत नसल्याचे समोर आले आहे.
-----------------------------------------------
आगीची कारणे
फळ मार्केट वगळता यातील बहुतांशी आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर फळ बाजारात आंबा मोसमात येणारे सुके गवत, लाकडी पेटी आणि पुठ्ठे यामुळे आगीच्या घटना घडत असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी राहणारे कामगार जेवण बनवताना गॅसचा वापर करीत असल्याने आग लागल्याचे प्रकार वाढले आहेत.
------------------------------------
या उपाययोजनांची गरज
- आगीच्या घटना टाळण्यासाठी बाजार परिसरातील इमारती, दुकाने अथवा गाळ्यांमध्ये वायरिंग अथवा इतर विद्युत यंत्रणेचे इलेक्ट्रिक ऑडिट नियमित करणे गरजेचे आहे.
- आग लागून अधिक प्रमाणात पसरू नये, म्हणून साठवणूक करून ठेवण्यात येणाऱ्या मालामध्ये शक्य तेवढे अंतर ठेवावे. अधिक प्रमाणात वायरिंग कन्सिल करण्याचा प्रयत्न केला जावा. कामगारांनी जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर करू नये.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़------------------------------------
आगीच्या घटना
ठिकाण तारीख
ट्रक टर्मिनल - ५ जुलै २०२५
धान्य मार्केट - २४ एप्रिल २०२४
फळ बाजार - २२ मार्च २०२२
कांदा-बटाटा मार्केट - १० जून २०२१
मसाला मार्केट - २५ फेब्रुवारी २०२१
भाजीपाला - २ ऑगस्ट २०२१
-------------------------
बाजार समितीमधील मार्केटमध्ये आग विझवण्यास जाताना अडथळे आहेत. तीन सिग्नल पार करत वाहतुकीचा अडथळा ओलांडून जाताना अधिक वेळ जातो. त्या वेळेत आगीने मोठे स्वरूप प्राप्त करून मोठ्या प्रमाणात हानी होते. बाजार समितीकडे ही यंत्रणा असल्यास आगीच्या ठिकाणी त्वरित जाता येईल.
- पुरुषोत्तम जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी
---------------------
व्यापाऱ्यांना प्राथमिक अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीतील अग्निशमन जागेबाबत मालमत्ता विभागाकडून माहिती घ्यावी लागेल.
- डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.