कळवा-वाशी उन्नत रेल्वेमार्ग रखडला
डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : कळवा-वाशी उन्नत रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजूर झाला असून कामही सुरू झाले होते; मात्र सध्याच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तो अर्धवट अवस्थेत थांबला आहे, असे डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र लोहोकरे यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
पत्रात लोहोकरे यांनी मुंबई उपनगरातील रेल्वे वाहतुकीसंदर्भात काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. त्यानुसार पनवेल- दिवा- वसई मार्गाला बोरिवलीकडे वळवून प्रवाशांना दादर मार्गाचा वापर कमी करता यावा. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, पनवेलसारख्या परिसरातील लोकांना पश्चिम उपनगरात जाताना होणाऱ्या अडचणी कमी होतील. तसेच, डोंबिवली लोकलसह संपूर्ण रेल्वे सेवेत गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ठाणे-कल्याण रेल्वेमार्गावर पाचवा आणि सहावा मार्ग उपलब्ध असूनही, मेल आणि एक्स्प्रेस गाड्या जुन्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरून चालत असल्याने उपनगरीय लोकल गाड्यांना वेळेवर धावण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे या पाचवा आणि सहावा मार्गाचा पूर्ण वापर करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी शिफारसदेखील पत्रात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोपर रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबण्याची सोय केली पाहिजे, ज्यामुळे डोंबिवली, कल्याण आणि कसारा येथील प्रवाशांना वसई किंवा पनवेलला जाण्याची गरज नाहीशी होईल. ठाणे-पनवेल मार्गावर जशी एक्स्प्रेस गाड्या पुण्याकडे जातात, त्याचप्रकारे उपनगरीय गाड्याही यामार्गे सुरळीत धावाव्यात.
लोकल वाहतुकीत चुंबकीय प्रणालीचा वापर करून दर दीड मिनिटाला लोकल गाड्या चालविण्यात याव्यात, असेही पत्रात सुचवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रयोग झाले असून, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या प्रस्तावांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीत मोठा बदल होऊन प्रवाशांना सुविधा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते; तसेच या कामाला वेग देऊन प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी डोंबिवली पॅसेंजर असोसिएशनने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.