नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणमध्ये पारंपरिक मिरवणूक
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या शोभायात्रेत परिसरातील आगरी-कोळीबांधव पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. सांस्कृतिक देखावे, सजवलेली पारंपरिक होडी, बैलगाड्या, ब्रास बँड आणि भव्य सोन्याचा नारळ हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. ढोल-ताशांच्या गजरात आणि कोळीगीतांच्या तालावर आबालवृद्ध नाचत मिरवणुकीत सहभागी झाले. या सोहळ्याच्या शेवटी, दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेशघाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला. या सोहळ्यात आमदार विश्वनाथ भोईर यांनी सहभाग घेतला. त्यांनी माहिती दिली, की समुद्रदेवतेची पूजा करून दर्याला नारळ अर्पण करणे ही कोळी समाजाची पारंपरिक आणि श्रद्धेची परंपरा आहे, जी दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त जपली जाते.
........................
कोळीबांधवांची गणेशघाटावर मिरवणूक
डोंबिवली : नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणात आगरी-कोळी समाजाने पारंपरिक उत्साहात मिरवणूक काढत समुद्रदेवतेला नारळ अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाट या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये हजारो कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी पोशाख, ढोल-ताशा, कोळीगीते, सजवलेले चित्ररथ, आणि सोन्याचा नारळ घेऊन भव्य मिरवणूक काढली. यामध्ये कोळी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा देखावा, मच्छीमारी व्यवसायाचे चित्रण आणि सागरी जीवनाशी नाते सांगणारे रथ हे विशेष आकर्षण ठरले. मिरवणुकीच्या अखेरीस दुर्गाडी खाडीकिनारी समुद्रदेवतेची विधिवत पूजा करून नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी दर्याला शांती आणि भरघोस मासेमारीसाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मिरवणुकीत सहभागी होत समाजाच्या भावना मांडल्या. त्यांनी दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची आग्रही मागणी केली. ते म्हणाले, दि. बा. पाटील हे केवळ आगरी-कोळी समाजाचे नव्हे, तर सर्व समाजासाठी कार्य करणारे नेते होते. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विमानतळाला त्यांचे नाव द्यावे. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले, की आगरी-कोळी समाज हा जाती-पातीच्या राजकारणात न पडता सर्वसमावेशक विचार घेऊन पुढे चालतो; मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेत आगरी-कोळी नगरसेवकांची संख्या लक्षणीय असून, यंदा महापौरपद आगरी-कोळी समाजाला द्यावे, अशी मागणीही त्यांनी नेत्यांकडे मिरवणुकीच्या माध्यमातून केली.
.......................
टिटवाळ्याच्या मांडा कोळीवाड्यात जल्लोष
टिटवाळा (वार्ताहर) : मांडा कोळीवाडा येथे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित नारळी पौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साह, आनंद आणि पारंपरिक जल्लोषात पार पडला. सकाळपासूनच कोळीवाडा रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखातील महिला, पुरुष आणि लहानग्यांनी गजबजले होते. पारंपरिक नऊवारी साड्या, सोन्याचे दागिने आणि शोभिवंत अलंकार परिधान केलेल्या महिलांनी लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकले. ढोल-ताशा आणि कोळीगीतांच्या सुरांनी परिसर भारून गेला. या उत्सवाचे आकर्षण ठरले लोकप्रिय रॉक सिंगर सपना पाटील यांचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा, ज्यात कोळीगीते आणि मराठी लोकगीते यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. त्यांच्या गाण्यांवर तरुणाईसोबतच ज्येष्ठांनीही ताल धरला. तसेच बहुगुणी कलाकार शुभम कुमार, ‘रील स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेली गंगा हाटे (प्रणिता) आणि यूट्युबर आदेश पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. नारळी पौर्णिमेच्या परंपरेनुसार समुद्रदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली. कोळी समाजासाठी हा दिवस केवळ धार्मिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन मच्छीमारबांधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि गावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ग्रामस्थ मंडळाच्या उत्तम आयोजनामुळे आणि गावकऱ्यांच्या उत्साही सहभागामुळे हा उत्सव संस्मरणीय ठरला. समुद्राच्या लाटांप्रमाणेच मांड कोळीवाड्यातील आनंद आणि एकतेचा सोहळा अनेकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील. या वेळी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनीही उपस्थिती लावत गावदेवीचे दर्शन घेतले.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.