प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १३ : कोकणातील भक्त गणेशोत्सवाची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहात असतात. वसई, विरार, नालासाेपारा परिसरामधील चाकरमानी या सणासाठी चार दिवस का असेना आपल्या गावी जातात. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काही दिवस आधीच बुक करावे लागते. पण सुट्टी, गर्दी अशा विविध कारणांमुळे अनेकांना तिकीट नोंद करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना एसटी अथवा खासगी बसचा पर्याय निवडावा लागतो. पालघर जिल्ह्यातून गणेशोत्सवासाठी यंदा ४२४ एसटी बसची नोंद करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगडसह राज्यातील अन्य भागांतील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. कामानिमित्त ही मंडळी उपनगरात राहत आहेत, मात्र सणासुदीला सुट्टी घेऊन गावाकडे जातात. सध्या गणपतीसाठी गावी जाण्याची सर्वांची लगबग सुरू आहे. पण रेल्वेची सर्व तिकिटे आधीच बुक असल्यामुळे एसटी किंवा खासगी बसने मुंबईतील चाकरमान्यांना गावी जावे लागते. दरवर्षीप्रमाणे खासगी बसच्या भाड्यामध्ये वाढ झाली असून, अनेकांनी एसटी बसचा मार्ग धरला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाच्या एसटी बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील एसटी सेवेच्या बस गणेशोत्सव काळात १८ ठिकाणी धावणार आहेत. बाहेरगावी जाण्यासाठी एसटीच्या सुविधेला नागरिकांकडून पसंती देण्यात आली आहे. कोकणसह अन्य ठिकाणी राहणारे हजारो नागरिक हे रवाना होणार आहेत. पुढील आठवडाभर बुकिंग सुरू असल्याने या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
गुहागरसाठी सर्वाधिक बुकिंग
गुहागर येथे प्रवास करण्यासाठी सर्वाधिक १९३ बस प्रवाशांनी बुक केल्या आहेत. त्यानंतर राजापूर ३७, श्रीवर्धन ३५, मंडणगड ३३ आणि चिपळूणसाठी २७ गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना १५ टक्के सूट
बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत सेवा आहे. एसटी महामंडळाने यंदा एसटीचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बुकिंगच्या आकडेवारीमध्ये अजून वाढ होईल, असे एसटी विभागाचे म्हणणे आहे.
तीन दिवसांत एक कोटींचा पल्ला
रक्षाबंधनावेळी आलेल्या तीन दिवस सलग सुट्ट्यांमुळे पालघर विभागाने तीन लाख ५२ हजार किमी बस चालवल्या होत्या. या कालावधीमध्ये तीन लाख ३२ हजार प्रवाशांनी सरकारी सेवेचा लाभ घेतला. परिणामी एक कोटी ३८ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले.
रक्षाबंधन सणावेळी पालघर विभागाचे भरघोस उत्पन्न वाढले. गणेशोत्सव काळात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनीदेखील एसटी बुकिंग सुरुवात केली आहे. २० ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यास मुदत आहे. त्यामुळे एसटी फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
- कैलास पाटील, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन पालघर विभाग
विभागानुसार बस फेऱ्या
रत्नागिरी ३४६
रायगड ६९
सिंधुदुर्ग ७
कोल्हापूर २
एकूण ४२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.