उरण, ता. १४ (वार्ताहर)ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी दहीहंडीतून राजकीय आराखडे बांधणार आहेत. याच अनुषंगाने उरण तालुक्यात ११ ठिकाणी लाखोंच्या दहीहंड्या होणार आहेत.
उरण पोलिस ठाण्यात नऊ सार्वजनिक दहीहंड्या असून, न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ सार्वजनिक दहीहंड्या आहेत. भाजपचे मुकुंद गावंड यांनी पहिल्यांदाच पिरकोन येथे लाखमोलाची दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत यांची द्रोणागिरी नोड येथे दहीहंडी होणार आहे. त्याचबरोबर कामगार नेते महादेव घरत, शिंदे शिवसेनेचे अतुल भगत, आमदार महेश बालदी मित्रमंडळ, शिवसेना ठाकरे तर्फे द्रोणागिरी नोड आणि उरण शहरात दहीहंडी होणार आहे.
----------------------------
पोलिसांचा बंदोबस्त
उरण तालुक्यातील टाकीगावात राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहात कृष्णजन्मोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी पालखी सोहळा आकर्षण राहते. उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० ठिकाणी तर न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ ठिकाणी आणि मोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ ठिकाणी दहीहंड्या फुटणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून उरण पोलिसांचा बंदोबस्त आहे.