नवी मुंबईत भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबईतील दिघा, ऐरोली आणि घणसोली परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच दिघा येथे भरदिवसा एका मुलाला भटक्या श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर पालक लहान मुलांना एकटे बाहेर पाठवण्यास घाबरू लागले आहेत.
शासकीय निर्बीजीकरण मोहिमा प्रभावीपणे न राबवल्याने भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे केवळ पादचारीच नव्हे, तर वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऐरोलीसह पटनी कंपनी परिसर, गणपती पाडा, दिघा, एमआयडीसीतील यादव नगर, इलठण पाडा, घणसोली व गोठिवली भागात रात्रीच्या वेळी श्वानांच्या टोळ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा पाठलाग करताना दिसून येतात. एमआयडीसी परिसरात तर भटक्या श्वानांची संख्या इतकी वाढली आहे की, रात्री उशिरा घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. घणसोलीतील सिडको वसाहतींमध्येही ही समस्या गंभीर असून, सोसायटीच्या आवारात बिनधास्तपणे श्वानांचे टोळके वावरत असल्याने लहान मुलांना एकटे सोडणे कठीण झाले आहे.
...............
रेल्वेस्थानकही सुटले नाही
ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक रेल्वेस्थानक परिसरातही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आहे. फलाट आणि आवारात कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, प्रवाशांना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, निर्बीजीकरण मोहीम, कुत्र्यांचे पुनर्वसन आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणे यासाठी महापालिकेने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.