पालघर, दि. १४ (बातमीदार) : पालघर नगर परिषद हद्दीत भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे हा दावा फोल ठरत असल्याचे दिसत आहे. सध्या नगर परिषदेच्या प्रत्येक प्रभागात ५०-६० भटकी श्वान असून, त्याचा उपद्रव सामान्य नागरिकांना होत आहे. आणि म्हणूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मे, जून, जुलै या तीन महिन्यांमध्ये तब्बल ५०० पेक्षा जास्त नागरिकांना भटक्या श्वानांनी चावे घेतल्यामुळे नागरिक असुरक्षित आहेत.
पालघर शहरामध्ये भटक्या श्वानांचा मुद्दा दिवसागणिक डोकेदुखी ठरू लागला आहे. अलीकडच्या काळात अनेक नागरिकांना व लहान मुलांना या श्वानांनी चावे घेतल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा निर्माण झाला. त्यानंतर नगर परिषदेने काही उपाययोजना केल्या. त्यानंतर मात्र पुन्हा श्वानांची संख्या वाढली. आता रस्त्यावरील पादचारी नागरिक, मोटारसायकल चालक यांच्या मागे हे श्वान धावून जात असल्याने अपघाताची शक्यता व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रात्री-अपरात्री चालत व वाहनाने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर श्वान धावून जात असल्याने अपघात घडले आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर पादचाऱ्यांना चावा घेतल्याचे प्रकारही घडले आहेत.
नगर परिषदेच्या १४ प्रभागात श्वानांना पकडण्यासाठी व त्यांच्या निर्बीजीकरण उपाययोजना करण्यासाठी एक पथक व एक केंद्र आहे. शहरात हजार ते दीड हजार श्वान असल्याचा अंदाज आहे. श्वानांमुळे शहरात अस्वछता पसरत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या परिसरात त्यांची विष्ठा दिसून येते. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर भटके श्वान गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा कुंडीतील कचरा सर्वत्र पसरवत असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही ताप वाढला आहे.
चौकट
गेल्या तीन महिन्यांत ५००च्या वर नागरिकांना घेतले चावे
पालघर नगर परिषद क्षेत्रात असलेल्या शहरी दवाखान्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांत चार नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना नोंद आहेत. तर पालघर व परिसरातील १५९ नागरिकांना मे महिन्यात, १५१ नागरिकांना जूनमध्ये तर जुलैमध्ये सर्वाधिक १९६ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावे घेतल्याची व त्यावर उपचार घेतल्याची नोंद पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे.
कोट
पालघर शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम आणखीन प्रभावी केली जाणार आहे. यासह रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम राबवून नागरिकांना सुरक्षित करण्याचा आराखडा तयार आहे. येत्या काळात हे अभियान राबवून श्वानांना वेगळीच प्रतिबंधात्मक लसी टोचल्या जातील.
- नानासाहेब कामोठे, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.