मुंबईत दररोज ५७ भटक्या श्वानांची नसबंदी
तीन वर्षांत ९० हजारांहून अधिक लोकांना रेबीज लस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः भटक्या श्वानांवरून आधीच जगभरात संतापाचे वातावरण आहे. त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, यावर्षी पालिका संस्थांच्या मदतीने दररोज सरासरी ५७ श्वानांची नसबंदी करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा दररोज ४६ एवढा होता. परिणामी, श्वानांच्या संख्येच्या सर्वेक्षणात संख्येत घट दिसून आली आहे. तर मागील तीन वर्षांत ९० हजारांहून अधिक लोकांना रेबीज लस देण्यात आली आहे.
पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या मते, १९९४ ते जून २०२५ पर्यंत, एकूण ४,३०,५९५ भटक्या श्वानांची नसबंदी करून रेबीजविरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे. तर २०२३ ते २०२५ दरम्यान ‘वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिसेस’च्या ‘मिशन रेबीज’च्या मदतीने ९०,४४७ श्वानांना रेबीजसाठी लसीकरण करण्यात आले.
पालिकेने शहरात भटक्या श्वानांची संख्या आणि रेबीजचा धोका कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली आहे. पालिकेच्या या प्रयत्नांमुळे मुंबईतील सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे.
............................
मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या (पालिका सर्वेक्षण)
वर्ष संख्या
२०१४ ९५,१७२
२०२४ ९०,७५७
१० वर्षांत भटक्या श्वानांच्या संख्येत २२ टक्क्यांची घट
................................
वर्ष दररोज नसबंदी केलेल्या श्वानांची संख्या एकूण संख्या
२०२३ ४१ १४,९५४
२०२४ ४६ १६,८४९
२०२५ ५७ १०,३७२
(जूनपर्यंत)
भटक्या मांजरींवरही नियंत्रण
केवळ श्वानच नाही, तर भटक्या मांजरींवरही नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे. २०१९ पासून आतापर्यंत २४,५०४ मांजरींचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करण्यात आले आहे.
रेबीजबद्दल लोकांची जागरूकता
पालिकेने शाळांमध्येही जागरूकता कार्यक्रम राबवले आहेत. २०२४ मध्ये ९५,८०६ मुलांना आणि २,२६९ शिक्षकांना रेबीज आणि भटक्या कुत्र्यांबद्दल माहिती दिली. २०२५ मध्ये मेपर्यंत ३६,३२१ मुलांना आणि ७७६ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
भटक्या श्वानांबद्दल तक्रारीसाठी संपर्क
महालक्ष्मी - ९९८७७९८४३६
मुलुंड - ८६९२०६८९९३
वांद्रे - ९०७६२०२२०८
मालाड - ९०७६२०२२०७