‘टाटा’त प्रोटॉन थेरपीतून ५०० रुग्णांवर उपचार
दुष्परिणाम टाळण्यासह अचूक उपचारांसाठी प्रोटॉन फायदेशीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कर्करोगाच्या रुग्णांसाठी प्रोटॉन थेरपी वरदान ठरत आहे. अणुऊर्जा नियमन मंडळाच्या अंतर्गत सुरू झालेल्या खारघर येथील ‘अक्ट्रेक’च्या प्रोटॉन थेरपी केंद्राला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत इथल्या तज्ज्ञांनी जवळपास ५०० कर्करुग्णांना प्रोटॉन थेरपीचे उपचार दिले आहेत. त्यातच या ठिकाणी आता तीन रुग्ण उपचार कक्षातून उपचार करणे शक्य झाले आहे. हे केंद्र सार्वजनिक क्षेत्रातील पहिले केंद्र आहे.
टीएमसी प्रोटॉन थेरपी सेंटरचे प्रभारी डॉ. सिद्धार्थ लस्कर यांनी सांगितले, की १५ ऑगस्ट २०२३ पासून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ५४१ रुग्णांना प्रोटॉन थेरपी सुविधेत उपचार मिळाले. यामध्ये ६५ टक्के रुग्णांवर अनुदानित खर्चाच्या स्वरूपात उपचार करण्यात आले. तर १४६ म्हणजेच २७ टक्के रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. ‘टीएमसी’चे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले, की अॅक्ट्रेक येथील प्रोटॉन थेरपी सेंटर हे ‘टीएमसी’च्या सर्व गरजू रुग्णांना उपचारांसाठी पैसे देण्याची क्षमता विचारात न घेता, अत्याधुनिक कर्करोग उपचार प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दरम्यान, टीएमसी प्रोटॉन थेरपी सुविधेने देशाच्या सर्व भागांतील रुग्णांना सेवा दिली आहे. यामध्ये देशातील पश्चिम भागातील ५२ टक्के, पूर्व भागातील २३ टक्के, उत्तर भागातील १४ टक्के, दक्षिण भागातील ६ टक्के आणि मध्य भागातील चार टक्के रुग्णांचा समावेश आहे. त्यातच आता टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी), भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) मधील शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान आणि जीवशास्त्राचे मूल्यांकन करणारे संशोधनदेखील या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत.
...
१६ टक्के बालरोग वयोगटातील रुग्ण
प्रोटॉन थेरपीचे उपचार घेतलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सीएनएस ट्यूमर ३८ टक्के आणि हाडांचा ट्यूमर २३ टक्के त्यानंतर डोके आणि मानेचे ट्यूमर १९ टक्के, बालरोग ट्यूमर, स्त्रीरोग, स्तन, प्रोस्टेट आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्यूमर यांचा समावेश होता. आतापर्यंत या केंद्रात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञ उपचार गटांकडून तपासणी करण्यात आली आहे; जेणेकरून प्रोटॉन थेरपीचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमीत कमी दुष्परिणामांसह त्यांचे उपचार पूर्ण होतील.