जखमी गोविंदांसाठी आरोग्य यंत्रणा सतर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईत शनिवारी (ता. १६) पाऊस आणि उत्साहात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. गोविंदा पथकाने सर्वात उंच थर बनवून हंडी फोडण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे हंडी फोडताना जखमी होणाऱ्या गोविंदांच्या उपचारांसाठी मुंबई महापालिका (पालिका) आणि सरकारी रुग्णालये पूर्णपणे सतर्क आहेत.
जखमी गोविंदांच्या उपचारांसाठी पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयांमध्ये १५०हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर आणि आपत्कालीन वॉर्डला सतर्क ठेवण्यात आले आहे. मुंबई पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांसह केईएम, नायर, सायन आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांच्या उपचारांसाठी १२५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय जे. जे. रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ड्रेसिंग सामग्रीसाठा करण्यासाठी सूचना
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले, की सर्व रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना सर्व औषधे, इंजेक्शन, ड्रेसिंग साहित्य आणि पीओपीचा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
..................
जे. जे. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये १० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आपत्कालीन वॉर्डमध्ये ३० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास आणखी बेड जोडण्यात येतील.
- डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय