सिलिंडर स्फाेटात मुलाचा मृत्यू
बंगळूर, ता. १५ (पीटीआय) : विल्सन गार्डन येथील चिन्नायनपाल्या येथे दाट वस्तीत शुक्रवारी झालेल्या सिलिंडर स्फोटात १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
सिलिंडरच्या स्फाेटात आठ ते १० घरांचे नुकसान झाले आहे. सिलिंडरमधून गळती झाल्याने हा स्फाेट झाल्याचा संशय आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळी भेट दिली.
शहर पाेलिस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनी सांगितले, की स्फाेट झालेल्या घरातील कुटुंब हे भाड्याने राहत हाेते. कुटुंबप्रमुख व्यक्ती हा मजूर असून ताे सकाळी कामावर गेला हाेता. त्यामुळे घरात त्याची पत्नी आणि मूल हाेते. ते दाेघे जखमी झाले आहेत, तर शेजारच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी ८.३०च्या सुमारास फोन आल्यानंतर पाेलिस त्वरित घटनास्थळी पाेहाेचल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तत्काळ बॉम्ब निकामी करणारे पथक, दहशतवादविरोधी पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल तसेच स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आल्याचेही सिंह यांनी सांगितले.