‘न्यू निस्सान मॅग्नाइट’ला दशकभराची सुरक्षा
गुरूग्राम, ता. १५ : निस्सान मोटर इंडियाने न्यू निस्सान मॅग्नाइटसाठी विशेष असा १० वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन (अतिरिक्त कालावधीसाठी वॉरंटी) आणला आहे. नवीन निस्सान मॅग्नाइटला प्रवासी सुरक्षेसाठी ५-स्टार रेटिंग आणि ‘एओपी’साठी (प्रौढ प्रवासी सुरक्षा) ५-स्टार रेटिंग मिळाल्यानंतर ही योजना कंपनीकडून जाहीर करण्यात आली.
निस्सानच्या या प्लॅनमध्ये तीन वर्षांची मानक वॉरंटी देण्यात आली असून, ती १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनमध्ये वाढवता येते. त्यामुळे फक्त २२ पैसे प्रति किमी किंवा १२ रुपये प्रति दिवस या वाजवी दरात १० वर्षे किंवा दोन लाख किमीपर्यंतचे संरक्षण कवच मिळते. त्यामुळे कारच्या अनपेक्षित दुरुस्ती खर्चात बचत होते आणि उच्च-गुणवत्तेच्या सेवेची हमीही मिळते. याबाबत निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले की, ‘न्यू निस्सान मॅग्नाइट ही भारतीय ग्राहकांसाठी गुणवत्ता, विश्वासार्हता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन मूल्याचे प्रतीक आहे. या कारला ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले असून, ती भारतातील सर्वात सुरक्षित बी-एसयूव्हींपैकी एक बनली आहे. आमच्या १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनसह आम्ही ग्राहकांना चिंतामुक्त मालकीचा अनुभव देत आहोत.’ दरम्यान, उत्तम वैशिष्ट्ये आणि वाढत्या जागतिक व्याप्तीसह न्यू निस्सान मॅग्नाइट आता ६५ हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती कंपनीने दिली.