जिल्हाधिका-यांची माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासीवाडी येथे भेट
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) : संवाद सेतू कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव तालुक्यातील गांगवली ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची आदिवासीवाडी तसेच शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील थरमरी आदिवासीवाडी येथे भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली.
याआधी एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही वाड्यांशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्या चर्चेनंतर मिळालेल्या सूचनांनुसार काही महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली. थरमरी आदिवासीवाडीत शाळेतील बंद पडलेले मीटर तातडीने सुरू करण्यात आले, तसेच रखडलेली घरकूल योजना पूर्ण करून लाभार्थ्यांना पत्रे वितरित करण्यात आली. खरबाची आदिवासीवाडीत जलजीवन मिशन कार्यान्वित करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय, दळी जमीन ३६ प्रमाणपत्रांतर्गत तब्बल १२५ एकर जमिनीचे वाटप लवकरच होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी स्वदेस फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आदिवासी समाजातील अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. ग्रामविकासासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
.........
ग्रामविकासाच्या कामांना गती
बैठकीदरम्यान प्रत्येक शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तहसीलदारांनी विभागनिहाय आढावा घेतला आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी काही दिवसांत पुन्हा एकत्रित बैठक घेऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच शिक्षण, पाणीपुरवठा, गृहनिर्माण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाला गती मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास वाढला असून शासनाशी त्यांचा संवाद अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.