पोलिस दलाच्या ‘हिमकन्येने’ एव्हरेस्टवर गायले राष्ट्रगीत
ठाणे पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांचा गौरव
ठाणे, ता. १७ (बातमीदार) : एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून अभिमानाने तिरंगा फडकवणारे अनेक गिर्यारोहक आहेत, पण ऑक्सिजन मास्कशिवाय चक्क राष्ट्रगीत गाण्याची कामगिरी ठाणे पोलिस दलाच्या ५० वर्षीय ‘हिमकन्येने’ केली आहे. द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे, असे या हिमकन्येचे नाव आहे.
नऊ वर्षे शिक्षक ते खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी, असा टप्पा गाठल्यानंतर आता या अवलिया पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांनी गिर्यारोहक ही नवीन ओळख निर्माण केली आहे. या उत्तुंग कामगिरीची दखल घेत ७९ व्या स्वातंत्र्यदिनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते द्वारका डोखे यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.
शालेय जीवनात दूरदर्शनवर कविता चौधरी यांच्या ‘उडान’ या मालिकेत दाखविलेला खेड्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास त्या वयात खूप काही शिकवून आणि पुढील आयुष्यासाठी जगण्याचे ध्येय देऊन गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या ठाणे नगर पोलिस दलात पोलिस निरीक्षकपदी त्या कार्यरत आहेत. खाकी वर्दी घातल्यानंतर, २२ मे २०२४ रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला सदस्य ठरल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय त्या टोकावर फक्त त्यांनी पाऊलच ठेवले नाही, तर तेथील ३३ टक्के ऑक्सिजन असलेल्या त्या सर्वोच्च शिखरावर ऑक्सिजन मास्कशिवाय देशाचे राष्ट्रगीत पूर्ण आदराने व सन्मानाने गायल्याचेही त्यांनी सांगितले. अशा त्या देशाच्या सर्व राज्यातील पोलिस दलातील पहिल्या सदस्य ठरल्याने त्यांच्या कामगिरीची दखल घेत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह १५ ऑगस्ट रोजी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
यातून मिळाली प्रेरणा
गिर्यारोहणाची आवड ‘साद देती हिमशिखरे’ या पुस्तकाच्या वाचनातून निर्माण झाली असून, गिर्यारोहणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या प्रवासाची सुरुवात वयाच्या ४२ व्या वर्षी म्हणजे २००६ पासून झाली आणि वयाच्या ५० व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
असे आहेत ध्येय, संकल्प
माउंट एव्हरेस्ट चढाईनंतर ‘मार्क इंग्लिश’ पुस्तक वाचून सर्व अष्टहजारी शिखरांची मोहीम फत्ते करण्याचा संकल्प मनात असल्याचे सांगताना, त्यांनी यावर्षी २०२५ मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या माउंट ल्होत्से या शिखरावर दुहेरी प्रयत्नानंतर यशस्वीपणे चढाई केल्याचे सांगितले. त्यातच आर्थिक बाब जुळून आल्यास पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाच्या माउंट मनास्लु मोहिमेत सहभागी होण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे. त्यानंतर पुढील वर्षी भारतातील सर्वोच्च शिखर तसेच जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कांचनगंगाची चढाई करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.