महापालिका भरती
स्थायी कर्मचाऱ्यांचा विरोध
भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महनगरपालिकेत रिक्त असलेल्या पदांपैकी २४० पदांची सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे, परंतु या सरळसेवा पद्धतीने भरतीला महापालिकेच्या कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. या पद्धतीमुळे पात्रता असतानाही पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये भरती प्रक्रियेबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळे महापालिकेच्या पदभरतीला स्थगिती देऊन सेवाप्रवेश नियमात आवश्यक ते बदल करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.
महापालिकेत रिक्त असलेल्या १०७८ पदांपैकी ३४० पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, अग्निशामक, चालक, बालवाडी शिक्षिका आदी पदांचा समावेश आहे, मात्र या भरतीला महापालिका कर्मचाऱ्यांच्या श्रमिक जनरल कामगार संघटना, श्रमजीवी संघटनेने आक्षेप घेतला आहे. या भरतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे. महापालिकेतील गेली २० ते २५ वर्षे कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. पदोन्नती देण्यासाठी पद रिक्त नसल्याचे कारण या कर्मचाऱ्यांना दिले जाते. महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक ते बदल न केल्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमांना २०१९ मध्ये राज्य सरकारची मंजुरी मिळाली. या नियमांनुसारच आताची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. वास्तविक हे सेवाप्रवेश नियम तयार करत असताना महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यातील किती कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येईल, याची महापालिकेच्या विविध विभागांकडून माहिती घेण्यात आली नाही. ते परस्पर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. सध्या महापालिका करत असलेल्या भरतीमधील पदे सेवाप्रवेश नियमानुसार केवळ सरळसेवा पद्धतीनेच भरण्याची तरतूद आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवणे, परीक्षा घेणे, मुलाखती घेणे आदी प्रक्रिया केली जाणार आहे. त्यााऐवजी सेवाप्रवेश नियमात नमूद असलेली पदे ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के सरळसेवा पद्धतीने भरण्याची तरतूद करण्यात आली असती, तर आज महापालिकेचे जे कर्मचारी अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतरही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनाही पदोन्नतीची संधी मिळाली असती, असे संघटनांचे म्हणणे आहे.
...तर आंदोलन करण्याचा संघटनांचा इशारा
सेवाप्रवेश नियमात आवश्यक असलेले हे बदल करून ते राज्य सरकारकडून मंजूर करवून न आणल्याने स्थायी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळण्यासाठी प्रशासनाने सेवाप्रवेश नियमात योग्य ते बदल करावे. त्यानंतरच भरती पक्रिया करावी, तोपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. या भरतीबद्दल स्थायी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. मागणी मान्य झाली नाही, तर कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.