रोह्यात आठ थर लावून फोडली हंडी
रोहा, ता. १७ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग मैदानावर आयोजित दहीहंडी उत्सवाला यंदा जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या लाख मोलाच्या व मानाच्या दहीहंडीत तब्बल ६२ जिल्हास्तरीय, ३९ तालुक्यांतील व २३ जिल्ह्याबाहेरील गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला.
मुख्य हंडी फोडण्यासाठी झालेल्या स्पर्धेत रोहे तालुक्यातील श्री वाकेश्वर गावदेवी गोविंदा पथक किल्ला व जय भवानी रोठखुर्द गोविंदा पथकाने आठ मानवी मनोरे रचत अंतिम विजय मिळवला. या दोन्ही पथकांना संयुक्तरीत्या २,२२,२२२ रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय सात थर रचणाऱ्या २० गोविंदा पथकांना प्रत्येकी ३३, ३३३ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तर सहा थर रचणाऱ्या ११ पथकांना प्रत्येकी ११, १११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले. महिला गोविंदा पथकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पाच थर रचणाऱ्या नऊ महिला पथकांना प्रत्येकी ९, ९९९ हजार, तर चार थर रचणाऱ्या १० पथकांना प्रत्येकी रोख ७, ७७७ हजार रुपयांसह बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दहीहंडी सोहळ्यात खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी हिंदी, मराठी, कोळीगीते व देशभक्ती गीतांनी रंगलेल्या ऑर्केस्ट्राचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली, तर जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त, फायर ब्रिगेड, सह्याद्री वनजीवन टीम आणि डॉ. अपूर्व भट यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य टीम सतर्क होती. नियोजनात सुनील तटकरे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.