रोहा येथील गिरोबा मंदिराची डागडुजी
रोहा (बातमीदार) ः रोहे शहरातील अंधार आळी परिसरात असलेल्या जागृत देवस्थान श्री गिरोबा मंदिराच्या डागडुजीसाठी रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी पुढाकार घेत एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. जनार्दन शेडगे मित्र मंडळामार्फत ही मदत करण्यात आली असून मंदिर समिती व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले. गिरोबा मंदिर हे रोहावासीयांच्या श्रद्धेचे केंद्र असून मागील काही वर्षांपासून त्याची दुरवस्था झाल्याने डागडुजीची गरज होती. या पार्श्वभूमीवर शेडगे यांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मदतीची घोषणा केली. यावेळी समीर शेडगे यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन ग्रामस्थांनी सन्मानपूर्वक सत्कार केला. कार्यक्रमास दत्ता जगताप, राजा शिंदे, संजय अवसरे, उदय धनावडे, स्वप्नील धनावडे, सचिन कारखानीस, नाना दळवी, तेजस शिर्के, अमेय जाधव, जयदेश अवसरे, प्रतीक काजारे, मानस भगत, सूरज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. श्री गिरोबा मंदिराच्या डागडुजीची कामे लवकरच सुरू होऊन ते भक्तांसाठी खुले होणार आहे.
.............
पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. रंगनाथन यांची जयंती
पेण (बातमीदार) ः ज्ञानार्जन व वाचन संस्कृतीचा पाया मजबूत करणारे आणि ‘भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ग्रंथालय उद्बोधन वर्ग व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करून ज्ञानसंपदा वाढवण्याचे आवाहन केले. वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
ग्रंथपाल मंगेश भित्रे यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने डॉ. रंगनाथन यांच्या आयुष्याचा आणि कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्याचबरोबर त्यांनी महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची माहिती, विविध संकेतस्थळे व ऑनलाईन साधनांचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण कुमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय मेघश्याम यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाविषयी आकर्षण वाढून, पुस्तक वाचनाच्या सवयीस चालना मिळणार असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.
.................
महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालयातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
पेण (बातमीदार) ः महात्मा गांधी ग्रंथालय वाचनालयातर्फे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सव्वा आठ वाजता ज्येष्ठ गांधीवादी व साहित्य अभ्यासक अरविंद वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्यकारी मंडळ, वाचक वर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनगे यांनी आपल्या भाषणात गांधी विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत नव्या पिढीने देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केला जाणारा हा उपक्रम वाचनालयाच्या सामाजिक भुमिकेला अधोरेखित करणारा ठरतो. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
.............
माजी सरपंच प्रभाकर उभारे यांचे निधन
माणगाव (वार्ताहर) ः माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रभाकर उभारे यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. माणगाव तालुक्यातील दाखणे गावचे सुपुत्र असलेल्या प्रभाकर उभारे यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. सलग दहा वर्षे सरपंच, पंचायत समितीचे सभापती आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या पुढाकारातून तालुक्यातील अनेक खेळाडू घडले. राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन, जिल्हास्तरीय मॅरेथॉन, कबड्डी व सायकल स्पर्धा तसेच शालेय खेळाडूंसाठी विशेष शिबिरे त्यांनी आयोजित केली. खर्डी येथील तालुका क्रीडा संकुल हे त्यांचेच स्वप्न होते. त्यांच्या ग्रामपंचायत कारकीर्दीत स्वच्छता, आरोग्य आणि पाणीपुरवठा यावर त्यांनी विशेष भर दिला. शैक्षणिक संस्थांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. जनतेची कामे अडवून न ठेवता नेहमी कार्यतत्पर राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या निधनाने माणगावकरांनी एक अष्टपैलू, सर्वमान्य नेते गमावले असल्याचे सांगण्यात आले.
...................
खोपोलीत फुटल्या लाखो रुपयांच्या दहीहंड्यां
खोपोली (बातमीदार) ः खालापूर-खोपोली परिसरात यंदादेखील दहीहंडी उत्सव उत्साह, थरार आणि शिस्तबद्धतेने पार पडला. विविध राजकीय पक्ष व मंडळांनी लाखो रुपयांच्या दहीहंड्यांचे आयोजन केले होते. या दहीहंड्या फोडण्यासाठी रायगडासह मुंबई, ठाणे येथून नामांकित गोविंदा पथके दाखल झाली होती. महिला पथकांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. मनोरंजनासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते. संपूर्ण शहरात शनिवारी दुपारनंतर दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. पारंपरिक दहीहंड्यांबरोबरच मोठ्या बक्षीसाच्या दहीहंड्यांनी तरुणाईचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित २ लाख २२ हजार रुपयांची दहीहंडी, साबळे फाउंडेशन आयोजित १ लाख ११ हजार रुपयांची दहीहंडी, तसेच पाली फाटा येथे अंकित साखरे प्रायोजित दीड लाख रुपयांची दहीहंडी विशेष आकर्षण ठरली. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही दुर्घटना न होता उत्सव शांततेत पार पडला.
................
गोपाळ कृष्ण संस्थेचा १२७ वा गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात
पेण (बातमीदार) ः पेण येथील गोपाळ कृष्ण संस्थेत १२७ वा गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता पदाधिकाऱ्यांनी वाजतगाजत श्रीकृष्णाची मूर्ती आणून हॉलमध्ये प्रतिष्ठापना केली. पं. रोहित धुपकर यांनी पौरोहित्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत करायला गेलो एक, या नाटकाचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. सकाळ-संध्याकाळी आरत्या घेण्यात आल्या. रात्री ह. भ. प. भाग्यश्री फडके यांनी कृष्णजन्माचे सुंदर कीर्तन केले. त्यांच्या अभंग निरूपणाने वातावरण भारावून गेले. दुसऱ्या दिवशी पारंपरिक दहीहंडी फोडण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. गेल्या शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव आजही सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा प्रतीक ठरत असून गावकऱ्यांच्या श्रद्धास्थानाला अधिक बळकटी देत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.