ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये औषधटंचाई?
दोन महिने पुरेल इतकाच साठा; मनोरुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : राज्यातील विविध मनोरुग्णालयांमध्ये औषधांचा साठा अवघा काही महिने पुरेल इतकाच शिल्लक असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रशासकीय कारणांमुळे व निधीच्या कमतरतेमुळे कमी प्रमाणत औषधांचा पुरवठा होत आहे. अशातच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातदेखील अवघे दोन महिने पुरेल इतकाच औषधांचा साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मानसिक आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांवर औषधोपचाराविना गंभीर परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून स्वतंत्र प्रादेशिक मनोरुग्णालयांची उभारणी केली आहे. त्यानुसार राज्यात ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये मानसिक आजाराग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत असतात. तसेच रुग्णांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करून उपचारदेखील करण्यात येत असतात. तर नैराश्य, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा मानसिक आजारांसाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. मात्र खरेदी प्रक्रियेतील विलंब आणि निधीअभावी मागील डिसेंबर महिन्यापासून राज्यातील मनोरुग्णालयांत कमी प्रमाणात औषधपुरवठा करण्यात येत असून, औषध पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मनोरुग्णांवर उपचार करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांतून मनोरुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात प्रतिदिन २५० ते ३०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यामधील बहुतांशी रुग्ण औषधांवर अवलंबून आहेत. यातील रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार एक महिना, १५ दिवसांची औषधे मोफत देण्यात येतात. मात्र मागील डिसेंबर महिन्यापासून औषध खरेदी प्रक्रिया रखडल्यामुळे त्याचा फटका या रुग्णालयालादेखील बसल्याचे दिसून येत आहे. ठाणे मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधांच्या खरेदीसाठी डीपीडीसी व स्थानिक पातळीवर नियुक्त करण्यात आलेल्या महामंडळाच्या माध्यामातून औषध खरेदी करण्यात येते. असे असले तरी सध्याच्या घडीला केवळ दोन महिने पुरेल इतकाच औषधसाठा उपलब्ध असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट :
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची क्षमता
बेड्सची संख्या १,८५०
दाखल रुग्णसंख्या ५५२
पुरुष रुग्णसंख्या ३५१
महिला रुग्णसंख्या १९०
चौकट :
औषधोपचार खंडित झाल्यास धोके
तज्ज्ञ डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मनोरुग्णांचे औषधोपचार अचानक थांबल्यास त्यांच्यात चिडचिड, आक्रमकपणा, नैराश्य, झोप न लागणे, हिंसक प्रवृत्ती अशा गंभीर लक्षणांची वाढ होऊ शकते. इतकेच नव्हे तर उपचारात खंड पडल्याने आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. काही वेळा असे रुग्ण घरच्यांसाठी व समाजासाठीही धोकादायक ठरू शकतात.
चौकट :
जिल्हा रुग्णालयासह १५ रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यात असताना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय अशा १५ रुग्णालयांतदेखील औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयाकडून औषध पुरवठा करण्यात येतो, मात्र त्याच ठिकाणी अवघा दोन महिने पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याची बाब समोर आली असून, कोट्यवधींची बिले थकल्यामुळे ठेकेदारदेखील औषध पुरवठा करण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या रुग्णालयांमध्येदेखील भविष्यात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.