बाप्पासाठी खास रंगीबेरंगी मखर
सजावटीच्या साहित्याने भरल्या बाजारपेठा, रोषणाईने झगमगणार बाप्पाचे आसन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : गणेशोत्सवामध्ये बाप्पासाठी केलेली सजावट ही आकर्षित करणारी असते. अनेक घरांमध्ये कुटुंबीय एकत्र येत सजावट करतात. तर काही जण बाजारातून विकत मखर आणतात. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये सर्व प्रकारची मखरे, पडदे, कृत्रित फुले, माळा व इतर वस्तू उपलब्ध आहेत. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
मुंबईत गणेशोस्तव खरेदीसाठी दोन महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. एक म्हणजे चिंचपोकळी स्थानकालगतचा लालबाग बाजार आणि दादर मार्केटला गणेशोत्सवाच्या खरेदीला अधिक पसंती मिळते. सध्या या दोन्ही मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. लालबागमध्ये १६ वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत असलेले सहेली इंटरप्रायजेस हे बाप्पाच्या सजावटीचे साहित्य विक्रीचे मोठे केंद्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्य इथे मिळते. घरगुती गणपतीसाठी एक फुटांपासून ते चार फुटांपर्यंतचे मखरे इथे उपलब्ध आहेत. चिंचपाेकळी व दादर मार्केट परिसरामधील पर्यावरणपूरक मखरांना गेल्या काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. सहा इंच्याच्या मूर्तींसाठी वेल्वेट आसन, एलईडी लाईट्स असणारे मखर, शंकराच्या पिंडी, मोराचे पीस असलेले मखर, फोल्डिंग मखर, लाकडापासून तयार केलेले मखर, फोटोफ्रेमचे लाकूड वापरून तयार केलेले आसन असलेले मखर उपलब्ध आहे.
जानेवारीपासून पर्यावरणपूरक मखर तयार करण्यास सुरुवात होते. प्रत्येक कारागीर त्यांच्या कल्पनेनुसार मखराची वेगवेगळे डिझाईन्स तयार करून देतो. प्रत्येक मखराला पाठीमागे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सजावटीचे सामान कृत्रिम असून, ते आकर्षक दिसते. फायबर, पुठ्ठा, स्पंज आणि रब्बर वापरून पर्यावरणपूरक मखरे आणि सजावटीचे साहित्य तयार करण्यात आले आहे. मखरांसोबत सजावटीचे साहित्य घेतल्यास तीन ते सहा हजारांपर्यंत संपूर्ण संच खरेदी करता येतो. चार ते पाच रंग असणारी विद्युत रोषणाई या संचासोबत उपलब्ध होते. दोन्ही बाजूंना सजावट म्हणून खांब उपलब्ध असून, त्यांची किंमत ३,००० रुपयांपर्यंत आहे. यासह पुठ्ठ्यांपासून तयार केलेल्या खांबांची किंमत १५० रुपयांपासून सुरू होते. यासह बाजारात कंठ्या, फुलांच्या मोठ्या माळा लक्ष वेधून घेतात.
छोट्या माळांची किंमत १२५ ते २५० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. गणपतीच्या मखराच्या मागे पडदा लावून सोडण्यासाठीच्या माळाही उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी लटकन आणि माळा १०० ते २०० रुपयांना मिळत आहेत. सिलिंग लावण्यासाठी कृत्रिम फुलांच्या माळाही उपलब्ध आहेत.
विद्युत समई १५० रुपयांपासून मिळत आहे. एक फुटापासून ते तीन फुटांपर्यंत फिरत्या समई उपलब्ध आहेत. यासह गणपतीसाठी लागणारे रंगबीरंगी पाटही बाजारात विक्रीसाठी आहेत. दादरच्या सर्व रस्त्यांवर सध्या आपल्याला खरेदीसाठी वेगवेगळे साहित्य पाहायला मिळते. गोंड्याच्या माळा, छोटे हार, कंठ्या १०० ते १५० रुपये जोडी उपलब्ध आहेत. यासह वेगवेगळ्या रचनेचे लाकूड आणि पुठ्ठ्यांपासून तयार केलेली मखरे दादरच्या गल्ल्यांमध्ये उपलब्ध आहेत.
विविध रंगांचे पडदे
दादरच्या हिंदमाता परिसरात बाप्पाचा टेबल सजवण्यासाठी पडदा आणि रंगीबेरंगी झालर खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील पदपथावर सर्व पडद्यांची दुकाने पाहायला मिळतात. या पडद्यांची किंमत ४०० रुपयांपर्यंत आहे. झालरला लेसही जोडता येते. याची किंमत १०० रुपयांपासून २५० रुपयापर्यंत आहे. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये त्या उपलब्ध आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ही दुकाने सुरू असतात. लालबागमधील अनेक जुनी पडद्यांची दुकाने आहेत.
दोन दिवसांत गणपतीसाठी कोकणात जायचे आहे. त्यासाठी खरेदी करायला लालबाग, परळ आणि दादरमध्ये फिरलो. विविध प्रकारची मखरे व इतर साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
- शिवाजी तोडकर, गणेशभक्त
शनिवार आणि रविवार हे तिन्ही दिवस गर्दीचे असणार आहेत. पर्यावरणपूरक मखरांना मागणी वाढत आहे. गेल्या चार वर्षांपासून आम्ही हे मखर तयार करतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४० टक्क्यांनी मागणी वाढली आहे.
- सुनील वोरा,
सहेली इंटरप्रायजेस, लालबाग, चिवडा गल्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.