सुभेदार वाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यदरबार
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कल्याणमधील मानाचा आणि गावकीचा गणपती असलेला गणेशोत्सव म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा. गेले १३१ वर्षे हा गणेशोत्सव अव्याहतपणे साजरा होत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या गणेशोत्सवामध्ये देखावा सादर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देखावा सादर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील सिंहासनापासून ते नगारखान्यापर्यंतचा संपूर्ण राजदरबार सुभेदार वाड्यामध्ये उभा केला आहे. चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी ही सर्व नेपथ्य उभे केले आहे. मंडळाच्या परंपरेप्रमाणे यावर्षी आगमन मिरवणुकीमध्ये पुण्याहून समर्थ ढोल-ताशा पथक आले होते.
या गणेशोत्सवाची खासियत म्हणजे दर दोन वर्षांनी व्यवस्थापक मंडळ बदलते आणि दुसऱ्या कोणत्या तरी स्थानिक मंडळाला सुभेदार वाडा गणेशोत्सवाचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळते. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्रीराम सेवा मंडळाने या गणेशोत्सवाचे व्यवस्थापन केले आहे. यावर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यदरबार ही संकल्पना घेऊन देखावा सादर केला आहे.
शस्त्रास्त्रांचे आणि नाण्यांचे प्रदर्शन
सुभेदार वाडा येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ४ तारखेला सुभेदार वाड्यामध्ये नवदुर्गा पुरस्कार सोहळा साजरा होईल आणि ५ तारखेला संपूर्ण समाजासाठी पानसुपारी आणि हळदी-कुंकू आयोजित केले आहे.