प्रभागरचनेने सत्ताधाऱ्यांना बळ
माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित, विरोधकांमध्ये संभ्रम
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ ः पनवेल महापालिकेची प्रभागरचना जाहीर झाली आहे. किरकोळ बदल वगळता २०१७ प्रमाणेच रचना असल्यामुळे भाजपमधील बहुतांश माजी नगरसेवकांचे प्रभार सुरक्षित झाले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणांनुसार ही प्रभागरचना सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडलेली आहे.
पनवेल महापालिकेची प्रभागरचना बुधवारी जाहीर करण्यात आली. समाविष्ट गावांमध्ये एक ते तीन प्रभागांमध्ये काही अंशी बदल आहेत. प्रभागामध्ये तळोजा परिसर येतो. येथे मुस्लिम लोक वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पट्ट्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर विधानसभेला पाठीमागे होते. त्यामुळे हा भाग महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचे लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उघड झाले. या तिन्ही प्रभागांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. येथील मुस्लिम मतदारांचे विभाजन केल्याचा आरोप राष्ट्रवादी युवा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल यांनी केला आहे. तसेच याबाबत हरकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर खारघरमध्ये वर्चस्व असलेल्या भाजपला पोषक वातावरण आहे. गुजराती, राजस्थान उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवाशांचे प्रमाण जास्त असल्याने भाजपला येथे सकारात्मक वातावरण आहे, परंतु उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. या ठिकाणी लीना गरड यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्यामुळे भाजपचे पारडे जड आहे.
---------------------------------------------------
प्रभाग क्रमांक आठमध्ये चुरस
प्रभाग क्रमांक आठमध्ये कळंबोली वसाहतीमध्ये माथाडी कामगार आणि श्रमजीवी मोठ्या संख्येने राहतो. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रातील मूळ रहिवासी मतदार या ठिकाणी आहेत. रोडपाली पट्ट्यामध्ये मिश्र लोकवस्ती आहे. कळंबोलीमध्ये राजकीय स्पर्धा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शहरप्रमुख तुकाराम सरक निवडणूक लढणार आहेत. या प्रभागातून सायली सरक निवडणूक रिंगणात उतरवल्या जातील, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपकडून बबन मुकादम नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, त्यांचे पुत्र तुषार पाटील आणि सून जागृती पाटील स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे या प्रभागात प्रचंड स्पर्धा आहे.
-------------------------
नवीन पनवेल, खांदा कॉलनी अनुकूल
नवीन पनवेल, खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ चा समावेश आहे. माजी उपमहापौर सीता पाटील, एकनाथ गायकवाड यांच्यासाठी हा प्रभाग अनुकूल आहे. येथे शेतकरी कामगार पक्षाकडून महादेव वाघमारे रिंगणात उतरू शकतील, परंतु मविआच्या तुलनेत भाजपचे येथे तुल्यबळ आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना समाधानकारक मतदान येथे झाले होते. प्रभाग क्रमांक १६ मध्ये डॉ. कविता चौतमोल आणि संतोष शेट्टी यांनी प्रतिनिधित्व केले. प्रभाग क्रमांक १७ येथून मनोज भुजबळ, संदीप पाटील संभाव्य भाजप उमेदवारांना वॉर्ड रचनेतून दिलासा मिळाला आहे.
-------------------------
पनवेल शहरात भाजपची ताकद
पनवेल शहरामध्ये प्रभाग क्रमांक १८ आणि १९ चा समावेश होतो. प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आमदार विक्रांत पाटील नगरसेवक झाले होते. पाटील बघता इतर तीनही उमेदवार शेतकरी कामगार पक्षाकडून जिंकले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी जवळीक असणाऱ्या नितीन पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती, मात्र म्हात्रे भाजपमध्ये आल्यामुळे हा प्रभाग अनुकूल आहे. १९ मध्ये परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक २०१७ ला निवडून आले होते. या वेळी भाजपसमोर कोणतेही आव्हान दिसून येत नाही.
----------------------------
कामोठेही अनुकूल
कामोठे वसाहतीत ११ ते १३ असे तीन प्रभाग आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक कमळ हातात घेऊन पुढील निवडणुकीची तयारी करत आहेत. या ठिकाणी काही बदल प्रभाग प्रारूप आराखड्यामध्ये करण्यात आले आहेत, मात्र या वसाहतीमध्ये भाजपला पोषक वातावरण आहे. प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मधून सचिन गायकवाड अनुसूचित जातीमधून प्रबळ उमेदवार मानले जातात. ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. याशिवाय विकास घरत, दिलीप पाटील यांच्याकरता प्रभागरचना अनुकूल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.