स्वच्छ मुंबईसाठी मृत्यूशी झुंज
विविध समस्यांमुळे सफाई कामगार मेटाकुटीस
विष्णू सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई स्वच्छ करण्याचे काम सफाई कामगार करत असतात. तसेच स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेच्या विशेष मोहिमा, मंत्री किंवा लोकप्रतिनिधींचे दौरे, उत्सव, मोर्चे काहीही असो, सफाई कामगार त्या ठिकाणी स्वच्छतेच्या कामाला जुंपला जातो; मात्र अपुऱ्या सुविधा, कामाच्या ठिकाणी दरररोज मुंबईबाहेरून पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत, यामुळे सफाई कामगार मेटाकुटीला येतो. ‘आता थांबायचे नाय’ या चित्रपटाने सफाई कामगारांचे सामाजिक वास्तव दाखविले; मात्र वस्तुस्थिती जैसे थे आहे. महापालिकेने काही पातळीवर सुधारणा करण्याचे प्रयत्न केले असले, तरी प्रत्यक्षात अनेक सफाई कामगार अजूनही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहे. दररोज साडेसहा हजार टन कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांना अत्यंत हलाखीच्या, असुरक्षित व अपमानास्पद परिस्थितीत काम करावे लागत आहे.
सफाई कामगारांना सकाळी साडेसहा वाजता कामावर हजर राहावे लागते. प्रत्येक बिटवर दोन कामगारांची नेमणूक असते. अडीच किमी रस्ते झाडायचे आणि कचरा भरायचा. प्रत्येक वॉर्डात १५ ते २० बिट असतात. मुंबईत २४ वॉर्डात सफाईचे काम चालते. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये सफाई निरीक्षक आणि पर्यवेक्षक, अवेक्षक नेमलेले असतात. नेमून दिलेले काम केल्यानंतर एखाद्या ठिकाणी सामूहिक सफाई करण्याचे आदेश दिले जातात आणि पुन्हा सफाई कामगारांना कामावर जुंपले जाते. सामूहिक सफाईचे काम चार-पाच बिटच्या कामगारांकडून किंवा काही चौक्यांच्या कामगारांकडून करून घेतले जाते. सामूहिक सफाईने कामगार त्रस्त होत आहेत.
चौक्यांमध्ये असुविधा
सफाई कामगारांसाठी प्रत्येक वॉर्डात चौक्या आहेत. तेथे सफाई कामगारांना विश्रांती व कामगारांची हजेरी होते. त्यांची दैनावस्था झाली आहे. तेथे कोणत्याही सुविधा नाहीत. विश्रांतीसाठीही तेथे पुरेशी जागा नाही. येथून साफसफाईचे साहित्य घेतले जाते. या चौक्यांमध्ये कामगारांना कपडे बदलावे लागतात. मूलभूत सुविधा नाहीत. चौक्यांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी व्यवस्था नाही. महिला सफाई कामगारांना सुरक्षित कपडे बदलण्याची जागा नाही.
पार्किंगमधील वाहनांमुळे कामगारांना शिक्षा
मुंबईत रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहने उभी केली असतात. त्याखाली कचरा जमा होतो, मात्र रस्ता साफ करताना वाहनांखालील कचरा काढता येत नाही. कामगार रस्ता साफ करून गेल्यानंतर पार्क केलेला गाड्या निघून जातात आणि गाड्यांखाली राहिलेला कचरा तसाच राहतो. पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच सफाई कामगाराला दोन-तीन दिवस घरी राहण्याची शिक्षा केली जाते.
कंत्राटी पद्धतीमुळे अस्थिर रोजगार
बहुतांश सफाई कामगार ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेले असतात. या कामगारांना कायमस्वरूपी कर्मचारी असण्याचे फायदे मिळत नाहीत. पीएफ, पेन्शन, वैद्यकीय सुविधा नाहीत. कामाची हमी नसते. काम नसेल तर पगार नाही. काही कामगारांना महिन्याला फक्त आठ हजार ते १२ रुपये वेतनापोटी मिळतात, तर कायम कामगार २५ हजार ते ४० हजार रुपये वेतन आहे.
असुरक्षित काम
सफाई कामगारांचे अत्यंत कठीण आणि असुरक्षित कामाचे स्वरूप आहे. नाल्यांची सफाई, गटारात उतरून काम करणे, रुग्णालयात मृत व्यक्ती उचलणे, मलमूत्र उचलणे, मृत प्राणी उचलणे ही सर्व कामे अत्यंत धोकादायक असतात. सुरक्षेची उपकरणे दिली जात नाहीत. अपघात, विषबाधा किंवा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईची व्यवस्था फारच अपुरी असते. घाणेशी संबंधित काम असल्यामुळे या खात्यातील कामगारांची आयुमर्यादा ४० ते ४५ असल्याचे समजते.
आरोग्य सुविधांचा अभाव
सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणावर श्वसनाचे विकार, त्वचारोग, हाडांचे आजार, तर काहींना संक्रमणजन्य आजार मोठ्या प्रमाणात होतात. नियमित वैद्यकीय तपासणी किंवा विमा योजनांचा लाभ मिळत नाही. कामगारांना आरोग्याच्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसते.
कामगार मुंबईबाहेर हद्दपार
पालिकेच्या सफाई कामगाराचे गेल्या काही वर्षांत कुटुंब वाढल्याने तो मुंबई बाहेर हद्दपार झाला आहे. सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना आणि आश्रय योजना या कागदावरच आहेत. कामगारांच्या कामाच्या तासापेक्षा त्याला उपनगरातून कामावर येण्या-जाण्यामध्ये जास्त वेळ लागत आहे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्या आरोग्यावर होत आहे.
................
मुंबईत दररोज जमा होणारा कचरा - ६ हजार ६०० टन
मुंबई महापालिकेतील कायम कामगार - २८ हजार ३८
कचरा वाहून नेण्यासाठीची वाहने - एक हजार ३३४
रिक्त जागा - तीन हजार ५८१
कंत्राटी कामगार - सात हजार
न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतेच कायम झालेले कामगार - ५८०
मुंबईच्या साफसफाईसाठी यंदाची आर्थिक तरतूद- ४९९ कोटी
स्वच्छता कार्यक्रमासाठी - १४० कोटी
मुंबईतील डम्पिंग ग्राउंड - गोराई, कांजूरमार्ग, देवनार, (मुलुंड सध्या बंद)
घनकचरा व्यवस्थापन खात्यात अनुसूचित जातीसाठी १०० टक्के आरक्षण आहे. तिथे कोणीच का आरक्षणाची मागणी करीत नाही. एकाच जातीने सफाईचे काम का करावे? मुंबई महापालिकेने या कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
- रमेश हरळकर, अध्यक्ष, सफाई कामगार परिवर्तन संघ
सफाई कामगारांच्या मालकी हक्काची घरे, कामगारांना कामाच्या ठिकाणी सुविधा, कामासाठी लागणारी साधने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पालिका श्रीमंत असूनही या कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. कामगारांची पेन्शन ग्रॅच्युइटी आधी थकीत देणी तातडीने द्यावीत.
सुनील चौहान, अध्यक्ष, सफाई कामगार विकास संघ
सफाई कामगार आणि कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांवर काम करणारे सफाई कामगार यांना आठ तासांऐवजी १२ तास काम देऊ नये. तसे केल्यास कामगारांच्या कामावर, त्याच्या कुटुंबावर आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने कामगारांना सुविधा देण्यावर लक्ष द्यावे.
औदुंबर तोरणे, चिटणीस, मुंबई मुनिसिपल कामगार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.