नैराश्यग्रस्तांना जगण्याची नवी दिशा
जिल्हा रुग्णालयात ‘मनोधार’ उपक्रमातून समुपदेशन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक आरोग्य हे एक मोठे आव्हान बनले आहे. नोकरीतील अपमान, प्रेमभंग, कौटुंबिक कलह, सामाजिक संवादाचा अभाव आणि बदलते सामाजिक व आर्थिक मूल्यमापन या साऱ्या गोष्टी अनेकांना नैराश्याच्या खाईत लोटत आहेत. अशा मानसिक दडपणात असणारे काही जण थेट आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळतात, मात्र अशा नाजूक टप्प्यावर असलेल्या व्यक्तींना वाचवण्याचे आणि त्यांना पुन्हा जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि कौतुकास्पद काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक करत आहेत.
आत्महत्या हा खरंतर पूर्णपणे मानसिक आजार असून, त्यावर उपचार आहेत. असे असताना नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याच्या घटना घडत आहे. अशाच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या ८९ जणांचे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत समुपदेशन करून त्यांना मृत्यूच्या वाटेवरून अलगद जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोरुग्णतज्ज्ञांनी केले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची गंभीर बाब जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली.
गतवर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तब्ब्ल ८२ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यात २८ पुरुष तर ५४ महिलांचा समावेश होता, तर यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ८९ जणांचा समावेश असून, यामध्ये ४० पुरुष, तर ४९ महिला आहेत. विशेष म्हणजे अशा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय तेली, डॉ. यशवंत सोलंकी, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद, मनोरुग्णतज्ज्ञ शर्मिला पठारे, मानसशास्त्र जिनी पटनी हे समुदेशन करून त्यांना आशेचा नवीन किरण दाखवत आहेत.
समुपदेशनाची गरज
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णलयातील मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सिद यांना विचारले असता, माणसाच्या मेंदूतील रासायनिक बदलांमुळे तसेच सामाजिक उपक्रमात मनमोकळेपणाने वावर नसल्यामुळे, तसेच संवादाचा अभाव झाल्यास माणसे आपल्या मनातील दुःख कोणाला बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर न कळत ताणतणाव निर्माण होतो. त्याच नैराश्यातून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण
महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्यामागे भावनिक अस्थैर्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, घरगुती कलह, मानसिक दबाव ही कारणे आहेत. काही महिलांना घरात संवादाचा अभाव, ऐकून घेणारा कोणी नसणे आणि अपेक्षांचे ओझे यामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलावेसे वाटते.
आशेचे नवे ठिकाण
ठाणे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभाग हे अशा रुग्णांसाठी केवळ उपचारकेंद्र नाही, तर ‘आशेचे एक ठिकाण’ बनले आहे. मृत्यूकडे वाटचाल करणाऱ्यांना जीवनाची नवी दिशा देण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे १७० आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णांना वाचवून त्यांचे जीवन पुन्हा उभे करण्यामागे मानसोपचारतज्ज्ञांचे सखोल ज्ञान, सहानुभूती आणि समर्पणभावना हे महत्त्वाचे घटक आहेत.
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण
वर्ष / कालावधी एकूण रुग्ण पुरुष महिला
२०२४ जानेवारी-ऑगस्ट ८२ २८ ५४
२०२५ जानेवारी-ऑगस्ट ८९ ४० ४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.