६५ बेकायदा बांधकाम प्रकरण
...तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ
बेकायदा इमारतींमधील राहिवाशांची आर्त हाक
पेट्रोलच्या बाटल्या घेऊन उतरले रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः आयरे गाव येथील श्री समर्थ कॉम्प्लेक्स या सात मजली अनधिकृत इमारतीवरील कारवाईचा प्रश्न चिघळत चालला आहे. चार महिन्यांचे मूल आहे, कोणाचे आई-वडील आजारी आहेत, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे. असे असताना आता आम्ही जायचे कोठे, असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. अखेर रहिवासी वैतागून सोमवारी (ता. ८) हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि कारवाईला आले तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ, असा इशाराच सरकारला दिला.
डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव, टावरे पाडा रोड येथे उभारलेल्या समर्थ कॉम्प्लेक्स या सात मजली अनधिकृत इमारतीवरील कारवाई प्रस्तावित आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने बांधकामधारक अक्षय सोलकर यांना नोटीस बजावून बेकायदा बांधकाम स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या इमारतीमध्ये एकूण ६० कुटुंबे वास्तव्यास आहेत. या इमारतीवर २० ऑगस्ट रोजी कारवाई प्रस्तावित होती; मात्र त्या दिवशी मुसळधार पावसामुळे व प्रभागातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने कारवाई थांबवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता पाडकामाची कारवाई निश्चित करण्यात आली; मात्र कारवाईच्या दिवशी इमारतीतील महिला रहिवासी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रस्त्यावर उतरल्या. पालिकेने कारवाई केली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ, असा इशाराच त्यांनी दिला. रहिवाशांच्या या भूमिकेमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली.
रहिवासी आक्रमक
याविषयी राहिवासी धनश्री कांबळे म्हणाल्या, माझी आई आजारी आहे. कालच रुग्णालयातून तिला घरी आणले आहे. २२ लाखाचे कर्ज घेतलेले आहे. या इमारतीवर एक हातोडा पडला तर मी माझ्या कुटुंबासकट अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेईन, असे त्या म्हणाल्या.
राहिवासी दीपाली वैश्य म्हणाल्या, माझी सहा महिन्यांची मुलगी आहे. कोणताही लढा लढण्याची आता आमच्यात हिंमत नाही. कधीही कारवाईच्या नोटीस, पोलिस, अधिकारी येतात. लहान मुले घाबरू लागली आहेत. सगळी कागदपत्रे पाहूनच आम्ही घर घेतले आहे. कारवाई झाली तर मी माझ्या मुलीसह येथे जीव देईन.
दरम्यान, या प्रकरणात ठाकरे गटसुद्धा रस्त्यावर उतरला असून जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी काही झालं तरी ही कारवाई होऊ देणार नाही, राहिवाशांच्या बाजूने आम्ही खंबीर उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारवाईला स्थगिती
रहिवाशांच्या भूमिकेमुळे प्रकरण आणखी चिघळले आहे. प्रशासन आणि राजकीय पातळीवर या प्रकरणाला अधिकच तीव्रता आली आहे. पालिका कारवाईस आता तूर्त स्थगिती देण्यात आली असली, तरी पुढील घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.