नेरूळमध्ये अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
स्थानिकांकडून वाहनतळ बांधण्याची मागणी
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात वाहन पार्किंग समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. नियोजनबद्ध शहरालादेखील पार्किंग समस्या भेडसावू लागल्याने त्याचे नियोजन होणे गरजेचे झाले आहे, तर नेरूळ परिसरात वाहनतळ उभारली जावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. वाशीमध्ये ज्या पद्धतीने वाहनतळ बांधली गेली आहेत; त्या धर्तीवर नेरूळ परिसरातदेखील वाहनतळ उभारण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नेरूळमधील बहुतांश गृहनिर्माण संस्थांमध्ये वाहने उभी करण्याची सोय नाही. त्यामुळे खासगी वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पार्किंग समस्या सोडविण्यासाठी पालिकेने काही सेक्टरमध्ये वाहनतळाबाबत नियोजनदेखील केले होते, मात्र अद्यापही ते कागदावरच असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी सगळेच रस्ते पार्किंगने व्यापले असून, वाहनचालक त्रस्त आहेत. नेरूळसारख्या उपनगरात सिडकोने तसेच खासगी विकसकांनी विकसित केलेल्या वसाहतीमध्ये पुरेशी वाहनतळांची सोय नाही. शहरातील अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर सर्रास वाहने उभी केली जातात. परिणामी सर्वच घटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नेरूळ परिसरात पालिकेने वंडर पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबईसारखे प्रकल्प उभे केले आहेत. याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, तेरणा व एमजीएम शिक्षण संकुले आहेत. खासगी रुग्णालये तसेच नवी मुंबई पालिकेचे माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळमध्ये आहे, परंतु अद्यापही सुरक्षित सार्वजनिक वाहनतळाची सोय करण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या आणि वाहनातही भर पडत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
..................
वाहन चोरीच्या घटनेत वाढ
नेरूळसह सिवूड्समधील सेक्टर-४६, ४८ परिसरातील सोसायटीत पुरेशी वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने बहुतांश वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे नियमित वाहतूक कोंडी होते. सुरक्षित वाहनतळ नसल्याने वाहन चोरी होणे, वाहनांचे भाग चोरीस जाण्याचे प्रकार वारंवार घडत असतात, तर वाहन पार्किंगवरून वाहनमालक किंवा चालकांमध्ये वाद होतात. नेरूळ नोड पूर्व व पश्चिम परिसर लक्षात घेता एकूण ५८ सेक्टर आहेत, मात्र एकही वाहनतळ नसल्याने वाहनचालकांनी वाहन कुठे पार्क करायचे, असा प्रश्न पडतो. नेरूळ रेल्वेस्थानक पूर्व व पश्चिम पे अँड पार्क वाहनतळ असले तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेता ते अपुरे पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.