मुंबई बाजार समिती प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवारांची चौकशीची मागणी; रसाळ यांनी आरोप फेटाळले
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेला प्रशासक स्वतःच स्वतःची नेमणूक कशी करू शकतो, असा सवाल ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे ही प्रशासक नेमणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर पणन संचालक विकास रसाळ यांनी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला; मात्र या निर्णयावरून आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे; मात्र ही नियुक्ती कायदेशीर असल्याचा खुलासा बाजार समिती प्रशासक विकास रसाळ यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, की या सरकारचे मंत्री तर महापराक्रमी आहेतच; पण आता एका अधिकाऱ्याचादेखील महापराक्रम पुढे आला असून या महोदयाने तर स्वतःच स्वतःच्या आदेशाने स्वतःची नेमणूक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी करून घेतली आहे. अशाप्रकारे नियुक्ती करता येते का? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती असून यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीवर डल्ला मारण्यासाठी तर ही नियुक्ती होत नाही ना? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. तर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पणन संचालक व सध्याचे प्रशासक विकास रसाळ यांनी या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देत आपली नियुक्ती पूर्णपणे कायदेशीर असून पणन कायद्यातील तरतुदीनुसारच झाली असल्याचे म्हटले आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर तात्पुरत्या व्यवस्थेसाठी प्रशासक नेमण्याची जबाबदारी कलम १६ (अ) नुसार पणन संचालकावरच असते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई बाजार समितीचे व्यवहार व्यापक आहेत. येथे सचिवपद हे अपर निबंधक सहकारी संस्था या संवर्गातील आहे. त्यावर वरिष्ठ अधिकारी म्हणून पणन संचालक हा पणन विभागातील एकमेव अधिकारी आहे. त्यामुळेच माझी प्रशासक म्हणून नियुक्ती केली गेली असून ही नियुक्ती योग्य आहे.
- विकास रसाळ, राज्य पणन संचालक
स्वतःची नेमणूक स्वतः करणे कितपत योग्य आहे. जर त्याची नेमणूक योग्य असेल तर संबंधित विभागाच्या सचिव आणि मंत्र्यांनी, पणन सचिव जे सांगत आहेत ते बरोबर असल्याचे सांगावे. माझ्या माहितीप्रमाणे स्वतःच्या सहीने स्वतःची नेमणूक करता येत नाही. तशी नेमणूक योग्य असल्यास संबंधित सचिव आणि मंत्र्यांनी तसे स्पष्टीकरण द्यावे.
- रोहित पवार, आमदार