कासा, ता. ९ (बातमीदार) : उधवा-धुंदलवाडी मार्गावरून टोल चुकवत जाणाऱ्या अवजड वाहनांविरोधात ग्रामस्थांनी रविवारी (ता. ७) रात्रीपासून तीव्र संघर्ष उभारला. पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेल्या या संघर्षात गावकऱ्यांनी तब्बल ४९ वाहने अडवून ठेवली. त्यानंतर ही वाहने दुपारी दापचरी चेकपोस्टवर नेऊन वजन तपासणी करण्यात आली. तपासणीत १९ वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन, तर १० वाहनांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भार असल्याचे आढळून आले. नियमभंगाच्या याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनचालकांकडून एकूण सहा लाख ९० हजारांचा दंड वसूल केला. दंडाची रक्कम ई-चलानद्वारे जमा करण्यात आल्याचे समजते.
आता पोलिस यंत्रणेकडून अवजड वाहने ग्रामपंचायत हद्दीतून सोडली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. संबंधित ठिकाणी बॅरिगेट्स लावून नियंत्रण व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या संघर्षावेळी प्रवीण ठाकरे, अविनाश मिसाळ, जयेश चौधरी, अरुण मिसाळ, अजय सावर, शिवराम चौधरी, राहुल महाकाळ, कमलेश गोतरना आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांना सतत अडचणींना सामोरे जावे लागत असून, यापूर्वीही दोनदा अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.