पेणच्या नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचे काम अपूर्ण
पावसामुळे काही ठिकाणी धोका; परिसरात भीतीचे वातावरण
पेण, ता. ९ (बातमीदार) : पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले ही खारबंदिस्ती वारंवार फुटत असल्याने येथील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या खारबंदिस्तीसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मंजूर होऊन त्यानुसार जवळपास १६ किलोमीटरच्या आसपास असणारे काम सुरू झाले; मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पेणच्या नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. या पावसाळ्यातही काही ठिकाणी धोका उद्भवला होता. त्यामुळे खारबंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे अशा खारबंदिस्तीना वारंवार धोका निर्माण होत आहे. तालुक्यातील नारवेल-बेनवले या खारबंदिस्तीचे काम खासगी कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. त्यानुसार या खारबंदिस्तीचे काम होत असताना, अनेकवेळा त्या ठिकाणी तडे जाऊन ते फुटत असल्याने हजारो एकर शेती नापीक होत होती. तसेच आजूबाजूला राहणाऱ्या घरांमध्येदेखील पाणी जाऊन त्यांचेही नुकसान होत होते. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाला वारंवार येथील स्थानिकांनी विरोध दर्शविला; परंतु प्रशासनाने याकडे कानाडोळा करत खारबंदिस्ती बांधून घेतली; मात्र आजही नारवेल-बेनवले या खारबंदिस्तीचे काम अपूर्ण असल्याने या पावसाळ्यातही धोका उद्भवत आहे.
..........................
नारवेल-बेनवले खारबंदिस्तीची मागच्या आणि याही वर्षाच्या पावसाळ्यात भयानक अवस्था पाहावयास मिळाली असून ११० कोटी रुपये नाहक खर्च झालेला आहे. या बंदिस्तीला वारंवार तडे तसेच बांध फुटणे असे प्रकार सुरूच आहे. याच भागातली माती टाकून बांधबंधिस्ती करण्यात येत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊन ठेकेदार मात्र गब्बर झाला आहे.
- राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ते
..................
चौकट
पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले या खारबंदिस्तीसाठी ९२ कोटी रुपये आले. त्यानुसार जवळपास पूर्ण काम झाले आहे; मात्र दोन ठिकाणी नागरिकांनी काम अडविल्याने ते राहिले आहे. प्रथमेश काकडे, जेव्ही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने काम केले असून त्यांना बिल अदा केले आहे. सर्व काम योग्य झाले आहे. काही क्षेत्रात काम राहिले आहे त्याची तरतूद केली असून त्याला मंजुरी मिळताच तीदेखील कामे केली जातील. तर काही थोडीशी कामे राहिली आहेत ती पावसाळा संपताच पूर्ण केली जातील, असे खारलॅन्ड विभाग, पेणचे उपअभियंता अतुल भोईर यांनी सांगितले.