काळू नदीत दोन बहिणी बुडाल्या
एकीचा मृत्यू; दुसरीचा शोध सुरू
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) : वासुंद्री परिसरात काळू नदीकाठी मोबाईलवर रील शूट करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणी नदीत बुडाल्याची घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एकीचा मृत्यू झाला असून दुसरीचा शोध सुरू आहे.
पाटीलनगरमधील आलिया अन्सारी (वय १८) व सना अन्सारी (वय आठ) या दोघी नदीकिनारी रील शूट करण्यासाठी गेल्या होत्या; मात्र त्या क्षणी नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात खेचल्या गेल्या. काही क्षणात ही घटना घडल्याने स्थानिकांना मदतीची संधी मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलातील जवानांनी नदीत शोधमोहीम हाती घेतली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आलिया हिचा मृतदेह सापडला, तर सना हिचे शोधकार्य अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, नदीकिनाऱ्यावरील सुरक्षेची उपाययोजना अपुरी असल्याने अशा दुर्घटना होत आहेत.