१७४ फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी
विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांच्या निकषांची वानवा
मुंबई, ता. ९ ः राज्यातील १७४ फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) महाविद्यालयांना नियमांचे आणि विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध न केल्याबद्दल फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) या महाविद्यालयांमध्ये बी. फार्म आणि डी. फार्मच्या प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याची कारवाई केली आहे. पीसीआयच्या नियमांचे पालन केले जाणार नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया करू दिली जाणार नसल्याचे डीटीईने स्पष्ट केले.
२०२२ ते २०२५ मध्ये राज्यात सुरू झालेल्या आणि नव्याने मान्यता मिळालेली सर्व फार्मसी महाविद्यालये ‘पीसीआय’च्या नियमांचे पालन किती करतात, याचा आढावा मे महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला होता. त्यात गेल्या तीन वर्षांत ‘पीसीआय’ने २२० नव्या पदविका आणि ९२ पदवी महाविद्यालयांना परवानगी दिली होती; मात्र ‘पीसीआय’च्या तपासणीत अनेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत आणि शैक्षणिक सुविधांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील १७४ महाविद्यालयांतील प्रवेश थांबविण्याचा निर्णय ‘डीटीई’ने घेतला आहे.
----
विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता
दरम्यान, राज्यात सध्या फार्मसी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू असून बी.फार्म अभ्यासक्रमासाठी ६० हजारांहून अधिक, तर डी.फार्मसाठी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे; मात्र आता प्रवेश स्थगित झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.