‘मेट्रो-२बी’वर आजपासून चाचणी
मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनपर्यंत धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या मेट्रो-२बी मार्गिकेच्या मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेवर उद्यापासून (ता. १०) मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएमएस) उपस्थितीत चाचण्या सुरू होणार आहेत. एमएमआरडीएने गेली सहा महिने त्यांच्या स्तरावर चाचण्या घेतल्या आहेत. आता सीआरएमएस चाचणीत मेट्रो पास झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
पश्चिम आणि पूर्व उपनगराचा परिसर जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मंडाळेदरम्यान २३ किलोमीटरची लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो ते चेंबूरच्या डायमंड गार्डनदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एमएमआरडीएकडून या मार्गावर १४ एप्रिलपासून चाचण्या सुरू आहेत. त्यात सर्व बाबी सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंंतर एमएमआरडीएने मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थित चाचण्या घेण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसार उद्यापासून या चाचण्या होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
--
कोणत्या स्थानकांचा समावेश?
- मंडाळे डेपो
- मानखुर्द
- बीएसएनएल मेट्रो
- शिवाजी चौक
- डायमंड गार्डन