पनवेल तालुका क्षयरोगमुक्तीकडे
७१ पैकी ३२ ग्रामपंचायतींमध्ये अभियानाला यश
पनवेल, ता. १० (बातमीदार)ः देश २०२५पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय केंद्राने आखले आहे. त्यानुसार क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान देशभर सुरू आहे. पनवेल तालुक्यात २०२३ पासून हा उपक्रम राबविण्यात येत असून ७१ पैकी ३२ ग्रामपंचायतीत अभियान यशस्वी झाले आहे.
पनवेल तालुका टी.बी. फोरम समितीची सभा उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाच्या अंमलबजावणीसाठीची बैठक आज पार पडली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा पवार यांनी अभियानाचे मार्गदर्शन केले. या अभियानातून ग्रामपातळीवर क्षयरोगाविषयी जनजागृती वाढविण्यासोबतच आरोग्यसेवांचा दर्जाही सुधारेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींच्या सहभागातून रुग्ण शोध, उपचार, जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. या सभेला नायब तहसीलदार डॉ. सुनील जाधव, डॉ. उषा राठोड, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील, वैभव मोकल, संतोष घोडिंदे, गुणवंत चव्हाण, डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ. आकाश वावेकर, जे. एस. चिखलेकर, एस. के. ढवळे, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप झावरे, तसेच आरोग्य सहाय्यक, सेवक-सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या.
-------------------------------------------
दानशूर व्यक्तींना आवाहन
पनवेल तालुका १०० टक्के क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किटची मदत देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्यासाठी संस्था, उद्योग संस्था-समूह, शासकीय अधिकारी, दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा पवार यांनी केले. उद्योग संस्था, समूह, दानशूर व्यक्ती यांनी निक्षय मित्र बनून अभियानात सहभाग नोंदवावा. तसेच पौष्टिक आहार किटमध्ये तृणधान्ये, कडधान्ये, वनस्पती तेल, दूध पावडर, फळे, सुका-मेवा यांचा समावेश होतो.
----------------------------------------
जिल्हाधिकारी बनले ‘निक्षय मित्र’
रायगडअंतर्गत जिल्ह्यातील पाच रुग्णांची जबाबदारी स्वीकारून जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्ह्यातील पहिले निक्षय मित्र बनले आहेत. क्षयरोगाच्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर रुग्णांना उपचार मिळूनही उपचाराचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. सकस पोषण आहार मिळाल्यामुळे रुग्णांच्या औषधोपचारात खंड पडत नाही. तसेच पुढील टप्प्यातील रुग्ण वेळेत पूर्ण बरा होतो.
----------------------------------
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ३२ ग्रामपंचायतींत यश आले आहे. पुढील वर्षी हे उद्दिष्ट वाढवण्यासाठी सर्वजण जोमाने काम करून संपूर्ण पनवेल तालुका क्षयरोगमुक्त होईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- डॉ. अपर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.