मृत अर्भकप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : नेताजी मार्केट परिसरात एका उघड्या नाल्यात मृत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. ९) सकाळी अंबरनाथ (पश्चिम) येथील नेताजी मार्केट परिसरात अशोक नेहरा यांना शौचालयाच्या दिशेने जाताना नाल्यात एका मृत अर्भक सापडले. हे अर्भक अंदाजे तीन ते चार महिन्यांचे असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. ही माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या क्रूर प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेनंतर काही स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन त्या अर्भकास सन्मानाने दफन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ९४ (जन्म लपवण्यासाठी अर्भकाचा त्याग करणे) अंतर्गत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महिला पोलिस उपनिरीक्षक कमल ठाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.