एसटी महामंडळाच्या अजब नियमाचा प्रवाशांना फटका
वेळेसह खर्च वाढला; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) : म्हसळा बसथांबा ते कांदळगाव फाटा हा रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी म्हसळा प्रशासनाने गणेशोत्सव काळात तात्पुरता पर्यायी मार्ग आखला होता, मात्र हा मार्ग प्रवासीवर्गासाठी डोकेदुखी ठरत असून, आता उत्सव संपूनही हा बदल रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण एसटी बसला चार किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात म्हसळा बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी श्रीवर्धन, माणगाव आणि महाड आगाराच्या ग्रामीण फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. या बदलानुसार, म्हसळा बसथांब्यावर आल्यानंतर बसेसना बोर्ली-पंचतन मार्गे, नंतर श्रीवर्धन पर्यायी रस्त्याने सकलपकडे वळसा घालून पुढे मार्गस्थ व्हावे लागत आहे, परंतु या बदलाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे. वळसा घेतल्याने प्रवासाचा वेळ वाढत असून, तिकीटदरात एक टप्प्याची वाढ झाल्याने प्रवाशांवर आर्थिक भार पडत आहे. चार किलोमीटरचा अनावश्यक वळसा आणि तिकीटदरात वाढ हा प्रवाशांच्या सहनशक्तीपलीकडचा प्रश्न आहे, अशी नाराजी प्रवासी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, म्हसळा बसथांबा परिसरात खासगी वाहने आणि व्यापाऱ्यांची मालवाहतूक वाहने सर्रास उभी केली जातात. म्हसळा बसथांबा ते कांदळगाव फाटा या अवघ्या ६०० मीटर अंतरात हीच मुख्य कोंडीची कारणे आहेत. त्यामुळे बसला वळसा घालण्यापेक्षा या वाहनांवर निर्बंध आणणे, वाहतुकीसाठी स्पष्ट नियमावली तयार करणे आणि कडक अंमलबजावणी करणे हाच मूळ उपाय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक प्रशासनाने केलेली ही तात्पुरती व्यवस्था आता कायमस्वरूपी झाली आहे, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन प्रवाशांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचवावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.