ठाणे तापाने फणफणले
डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ; पालिका आरोग्य विभाग सतर्क
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असले तरी पालिका आरोग्य विभाग सतर्क झाला असून घरोघरी जाऊन भेटी देणे, औषध फवारणी इत्यादी उपाययोजना आखण्यात येत आहेत.
पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढत असतात. विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेण्यात येते. वातावरणीय बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावरदेखील होत आहे. शासकीयसह खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
ठाण्यात मागील तीन महिन्यांत मलेरियाचे ३३६, डेंगीचे २७९, चिकनगुनियाचे ७०, लेप्टोचे ११ आणि डायरियाचे ५३३ रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन महिन्यांत आरोग्य विभागाकडून पाच लाख ४७ हजार ४०३ घरांत औषध फवारणी करण्यात आली आहे. सात लाख ३१ हजार ७९३ घरात धूर फवारणी, चार लाख २० हजार ४८१ घरांची तपासणी केली असता, त्यातील दोन हजार १४२ घरांतील पाणी दूषित आढळून आले आहे. तसेच चार लाख ७९ हजार ११० कंटेनरची तपासणी करण्यात आली असून, त्यातील दोन हजार ३६० कंटेनर दूषित आढळले.
‘ही’ घ्या काळजी
आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे. पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवाव्या. प्लॅस्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करावा. गटार, नाल्यांची नियमित सफाई करावी. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे. विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या वेळेत डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरावे. डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन ठाणे महापालिका आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.