भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
सततच्या पावसामुळे ५.५० हेक्टर भातशेतीचे नुकसान; शेतकरी चिंतित
पेण, ता. १० (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या सततच्या पावसामुळे भातशेतीवर करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषतः बारीक दाण्याच्या जातींवर या रोगाचा प्रभाव अधिक दिसून येत असून, दाण्यावर काळसर ठिपके, बुरशीजन्य डाग आणि किडीचे लक्षण स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पेण तालुक्यात एकूण ११ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे तालुक्यातील १२ शेतकऱ्यांची जवळपास ५.५० हेक्टर भातशेती बाधित झाली आहे. काही ठिकाणी रोपे कुजली असून, शेतामध्ये पाणी साचल्याने शेतीची नासधूस झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. गेल्या वर्षी तालुक्यात भातपिकाची चांगली परिस्थिती होती, पण शेवटी झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्म्याहून अधिक भातशेती वाया गेली होती. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती, मात्र यंदाही पावसाच्या लहरीमुळे पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. विशेषतः वढाव–खारेपाट आणि जोहे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बारीक दाण्याच्या जातींवर करपा रोगाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाणी साचल्याने रोपांची वाढ खुंटली आहे. पानांवर करपा रोगाचे ठिपके दिसू लागले असून, धान्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
..................
कृषी विभागाची पाहणी व मार्गदर्शन
भात रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बाधित शेताची पाहणी केली आहे. तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले, की कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी तत्काळ योग्य औषधांची फवारणी करावी. गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
..................
शेतकऱ्यांची मागणी
शेतकरीवर्गाने शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा स्थितीत रोगराईमुळे झालेल्या नुकसानीतून उभे राहण्यासाठी शासकीय मदतच एकमेव आधार ठरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.